धर्मांध शक्तीचा पाडाव करण्यासाठी आता लढाई जिंकायची आहे : चंद्रिकापुरे

0
15

अर्जुनी मोरगाव,दि.24 : देशात आरक्षणाच्या नावाखाली जाती जातीमध्ये विषारी बीजे रुजविण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. त्यासाठी आपण वेळीच सावध होणे गजरेचे आहे. मागासवर्गीय बहुजनांच्या विकासाचा आत्मा असलेले भारतीय संविधान राजधानी दिल्लीत जाळल्या जाते. हा आपला विकास संपविण्याचा डाव वेळीच उधळला पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी देवाधर्मातही वाद निर्माण केले. सध्या तर देवांनाही जाती जातीत फिट करण्याचे काम सुरू आहे. जो हिंदू आहे त्यांनी भाजपाला मतदान करावे, अशी अफूची गोळी देण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे अशा धर्मांद्ध शक्तीचा पाडाव करण्यासाठी आता आम्हाला पुढची लढाई जिंकायची आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केले आहे.

मानवता विद्यालय बोंडगावदेवी येथे २२ डिसेंबरला आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुथ लेव्हल कमिटीच्या सभेत ते बोलत होते. सभेला राष्ट्रवादीचे अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, राष्ट्रवादीचे युवा नेते दादा संग्रामे, राकेश लंजे, पतीराम मेश्राम, उद्धव मेहंदळे, आर.के. जांभुळकर, विहीरगावचे सरपंच अशोक डोये प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना मनोहरराव चंद्रिकापुरे म्हणाले, सध्याच्या शासन काळात शेतकऱ्यांवर संकटावर संकट येत आहेत. कर्जमुक्तीच्या संदर्भात सरकारचा अजूनही अभ्यासच सुरू आहे. तुडतुड्याचे पैसे अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांचे जमा झाले नाही. वनजमिनीवरील पट्ट्यासंदर्भात सध्या फायलीच फिरत आहेत. अर्जुनी मोरगावमध्ये साडेनऊ हजार हेक्टरचे पट्टे त्रुट्याअभावी तसेच पडून आहेत. पट्टे देताना अनेक जाचक अटी लावण्यात आल्या, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. इटियाडोहात पुरेसे पाणी असतानाही बऱ्याचशा शेतकऱ्यांना रब्बी पीक देण्यात येत नाही. झाशीनगर लिफ्ट ऐरिगेशनचे काम पूर्ण झाले नाही. मात्र, लिफ्टद्वारे नवेगाव तलावात पाणी सोडण्यासाठी इटियाडोहचे पाणी राखीव ठेवण्यात येत आहे. पालकमंत्री आपली जबाबदारी झटकत आहेत. म्हणून पुढे होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या बुथ लेव्हल कमिट्या मजबूत कराव्या लागणार आहेत. राष्ट्रवादीमध्ये तरुणांना आकर्षित करावे लागणार आहे. प्रत्येक निवडणुकांमध्ये ३० ते ३५ टक्के मतदारांना कोणताही पक्ष नसतो व नेमकी हीच मते उमेदवारांच्या विजयाची मते असतात. असे मतदार राष्ट्रवादीकडे कसे आणता येईल, या दृष्टीने बुथ लेव्हल कमिट्यांनी काम करावे, बुथ कमिटीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा पायवा मजबूत होणे गरजेचे आहे. आम्हाला आता निवडणुकांची लढाई लढून ती लढाई जिंकायची आहे. बुथ कार्यकर्त्यांनी शेवटच्या घटकातील मतदारांशी थेट संवाद साधून त्यांचे मतप्रवाहीत करून पक्षाचे ध्येय धोरण समाजाला कसे हितकारक आहेत. या शासनाच्या कथनी आणि करणीमध्ये किती तफावत आहे हे सांगण्याची गरज येऊन ठेपली आहे, असे आवाहनही मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येय धोरण यावर प्रकाश टाकून पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष दादा संग्रामे यांनी तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्याचे आवाहन करून वर्तमान शासनाला केवळ युवकच धडा शिकऊ शकतात, असे आवाहन केले. संचालन उद्धव मेहंदळे यांनी केले तर आभार राकेश लंजे यांनी मानले. .