हिरकणी महाराष्ट्राची या स्पर्धेमुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार-सुरेश प्रभू

0
35
????????????????????????????????????

वाशिम, दि. ०९ :  राज्याने गेल्या चार वर्षात अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. तळागाळातील माणसाच्या विकासासाठी अनेक योजना राज्यात राबविण्यात येत आहे. राज्यातील बचतगटातील महिलांनी सुध्दा विकासात आपले योगदान दिले आहे. हिरकणी महाराष्ट्राची या स्पर्धेतून महिला सक्षमीकरणाला चालना मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योजकता मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

मुंबई येथून आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांचे प्रतिनिधी, आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्याशी बोलताना श्री. प्रभू बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ‘हिरकणी महाराष्ट्राची’व ‘डिस्ट्रिक्ट बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन’ या स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे कौशल्य व उद्योजकता विकास मंत्री संभाजी निलंगेकर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष अॅड. विजया रहाटकर, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता हे प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री. प्रभू म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटावेत आणि राज्य प्रगतीकडे जावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून वॉर रूमची निर्मिती केली आहे. हिरकणी महाराष्ट्राची हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. केंद्र सरकार सुध्दा यासाठी मदत करणार आहे. राज्यात अनेक उद्योगशील, कल्पक लोक आहेत. त्यांच्या कल्पनेतून राज्याला विकासाची गती मिळणार आहे. स्वतःचा उद्धार करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. महात्मा गांधी यांनी ग्रामविकासाचे स्वप्न बघितले. ग्रामविकासाची सांगड या उपक्रमातून घालण्यात येत आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल, असे ते म्हणाले.

या स्पर्धेतून बचत गटांच्या महिलांनी पुढे यावे, असे सांगून श्री. प्रभू म्हणाले, त्यांच्यातील असलेल्या कल्पनेला पूर्णत्वास नेण्यासाठी महिलांनी व्यवसायासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. यामधून चांगल्या कल्पना जागतिक स्तरावर सुध्दा नेता येईल. सीडबी कडून कर्जपुरवठा करण्यास महिलांना मदत करण्यात येईल. विकासाचा दर वाढला पाहिजे, यासाठी राज्याचा विकास होणे आवश्यक आहे. हा विकास करायचा असेल तर जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. राज्यातील महिलांचे कल्याण करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ना. निलंगेकर म्हणाले, महिलांचा उद्योग क्षेत्रात मोठा सहभाग आहे. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम हिरकणी महाराष्ट्राची या स्पर्धेतून करण्यात येणार आहे. या स्पर्धेतून ग्रामीण भागातील महिला उद्योजक तयार करण्यास मदत होणार आहे. २४ फेब्रुवारी पासून बचत गटातील महिलांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.अकोला येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना कौशल्य विकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील प्रतिभावान महिलांना या स्पर्धेतून संधी मिळणार आहे. त्यांची संकल्पना राज्याच्या विकासाला हातभार लावणार आहे. बचत गटांच्या महिलांना उद्योग व्यवसायासाठी चालना देवून ही स्पर्धा महिलांना एक उद्योजक म्हणून पुढे आणण्यास हातभार लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अॅड. रहाटकार म्हणाल्या, महिला सक्षमीकारणासाठी ही अत्यंत चांगली योजना आहे. महिला ही आर्थिक सक्षम झाली पाहिजे. यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील महिला ह्या मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होतील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रास्ताविक कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी केले.वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक श्री. गोहाड, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक संचालक सुनंदा बजाज, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री. ठाकरे, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी यांचे प्रतिनिधी श्री. पांडे सहभागी झाले होते.