पशुपक्षी पालन करून सेंद्रिय शेती करावी :आ. रहांगडाले

0
19

तिरोडा,दि.21 : निसर्गाचा लहरीपणा व पिकांच्या उत्पादन खर्चात होणाऱ्या वाढीमुळे शेतकरी हैराण असल्याने शासनाद्वारे तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर पशुपक्षी मेळावे घेण्यात येत असून सर्व शेतकऱ्यांनी पशुपक्षी पालन करून आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे व रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळून पीक उत्पादन खर्च कमी करावे, असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले..

परसवाडा येथे पंचायत समिती तिरोडा व जिल्हा परिषद गोंदियातर्फे संयुक्तरित्या आयोजित पशुपक्षी मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी १० गटातून ३२९ पशुपक्ष्यांचा सहभाग होता, यात उत्कृष्ट पशुपक्ष्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तसेच या मेळाव्याप्रसंगी जिल्ह्यात पहिल्यांदाच उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात जवान शहीद झाले त्यामुळे या कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन कुणाचा सत्कार करण्यात आला नाही व त्या शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. परसवाडा येथे आयोजित पशुपक्षी मेळाव्याचे उद्घाटन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी पं.स. सभापती नीता रहांगडाले, सरपंच मनिराम हिगे,सर्वश्री जि.प. सदस्य कैलास पटले, प्रीती रामटेके, सुनिता मडावी, मनोज डोंगरे, डॉ. राजकुमार शहारे,गटविकास अधिकारी डी.बी. हरिणखेडे आदी उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक, संचालन व आभार पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश गंगपारी यांनी केले. या मेळाव्याप्रसंगी जिल्ह्यात पहिल्यांदा तालुक्यातील अंगणवाडीच्या ७ बीटमधील ७ उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका चंद्रप्रभा बिसेन, भावना बोदेले, नंदा कावळे, मिनाक्षी रहांगडाले, निशा रहांगडाले, दुर्गा सेतापे, मिनाक्षी पटले यांचा साडीचोळी, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील ११ पशुपालकांचा सपत्नीक पॅन्टशर्ट, साडीचोळी, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी पशुसंवर्धन विभागाचे डॉ. जी.एम. सातपुते, डॉ. विद्या वानखेडे, डॉ.एच.एच. घरत, एच.एल. मून, के.बी. वैरागडे, डी.बी. ठाकरे, पी.डी. सतदेवे, एस.डी. कुथे, विनय बोरकर यांनी सहकार्य केले. .