तांडा-मोरवाही क्षेत्रासाठी उपसा सिंचन योजनेला मिळणार मंजुरी

0
18

गोंदिया, दि. २१ :  : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने गोंदिया तालुक्यातील तांडा-मोरवाही क्षेत्रात उपसा सिंचन योजनेला तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. यामुळे या परिसरातील शेती आता सुजलाम्-सुफलाम् होणार असून या योजनेला बाघ सिंचन प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी मिळणार आहे.आमदार गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रात बाघ सिंचन प्रकल्पाच्या ३०० कि.मी. कालव्याची व्यापक दुरुस्ती, खोलीकरण व गाळ सफाई करून वीस हजार एकर जमिनीला सिंचनाची सुविधा निर्माण करून दिली. रजेगाव, काटी, डांगोर्ली व तेढवा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचन क्षेत्रात वाढ होत आहे. त्यासोबतच तांडा, अदासीपासून मोरवाहीपर्यंत काही गावांचा भूभाग उंच असल्यामुळे सिंचनाची सुविधा मिळाली नव्हती. यामुळे सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी गोपालदास अग्रवाल प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी बाघ सिंचन प्रकल्पाच्या वर्तमान कालव्यातून मोरवाही, ईरी, आसोली, दतोरा, पोवारीटोला, दागोटोला, तांडा, अदासी आदी गावांसाठी वेगळी उपसा सिंचन योजना निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. .

मंत्रालयीन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करून आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने शासनाने उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी दिली असून जलसंपदा विभागाने नागपूरस्थित विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकाला योजनेला अंतिम मंजुरीसाठी विस्तृत प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले आहे. शासनाला प्रस्ताव पाठविल्यानंतर सदर योजनेला मंजुरी मिळण्याचा विश्वास आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने मागील वर्षी राज्य सरकारने देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी बाघ प्रकल्पाच्या क्षेत्रातील कालव्यात सोडण्यात आले होते. यामुळे २० पेक्षा अधिक गावातील शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता..