स्वप्नपूर्तीच्या मोती सन्मानाने मुबारक सय्यद सन्मानित

0
18

मोती सन्मानासह विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण

लाखनी,दि.२६ः छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा २०१९ चा “मोती सन्मान” खराशी येथील जि.प. डिजिटल पब्लिक स्कुलचे मुख्याध्यापक माननीय श्री मुबारक सय्यद यांना त्यांच्या शैक्षणिक सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल खासदार मधुकरराव कुकडे, लाखनीच्या नगराध्यक्षा ज्योती निखाडे यांच्या हस्ते, सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. तुषार उमाळे, मूरमाडीचे सरपंच शेषराव वंजारी, समिती अध्यक्ष बाबुराव निखाडे, स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत वाघाये यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यावेळी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार मधुकरराव कुकडे तर उद्घाटक म्हणून लाखनीच्या नगराध्यक्षा ज्योतीताई निखाडे, प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. तुषार उमाळे, प्रमुख अतिथी म्हणून मूरमाडीचे सरपंच शेषराव वंजारी यांच्यासह समिती अध्यक्ष बाबुराव निखाडे मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रशांत वाघाये यांनी मोती सन्मान २०१९ सोबतच विविध स्पर्धांचे बक्षीस देखील घोषित केले. यात बालशिवशाहीर प्रणय चेटूले, बालशिववक्ता समीग्रा वनवे यांना विशेष पुरस्कार देण्यात आले. शिवजयंतीनिमित्त घेतलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये दिपाली बेदरे, इशिका राऊत, कुणाल लुटे, यथार्थ चेटुले यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. त्याचबरोबर पोवाडागायन स्पर्धेमध्ये खुशी चेटूले, वेदांत बांते, पेजल भूरे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय तर शिवसंस्कृती दर्शन नृत्यस्पर्धेत लिटील फ्लावर इंग्लिश स्कूलला प्रथम, स्व. निर्धनराव वाघाये पाटील महाविद्यालयाला द्वितीय आणि सम्यक सिंहगडेला तृतीय पारितोषिक देण्यात आले. स्वामी विवेकानंद वाचनालय व स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीने युवा दिनानीमित्त घेण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेत “अ” गटात भाग्यश्री नंदेश्वर, कावेरी तीतिरमारे, प्रांजली उइके यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आला तर “ब” गटात रक्षा शहारे, युगांत भोयर, जान्हवी बोंद्रे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आला. सर्व विजेत्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमलदादा गभणे यांनी तर आभार प्रदर्शन अजिंक्य भांडारकर यांनी केले. पुरस्कार वितरण समारंभाच्या यशस्वीतेसाठी सुधीर काळे, नीलेश राऊत, किशोर वाघाये, अतुल भांडारकर, संजय वनवे, उमेश सिंगणजुडे, आशिष राऊत, आशा वनवे, अतुल नागपुरे, सुधन्वा चेटुले, बाळासाहेब चव्हाण, विशाल हटवार, लक्ष्मण बावनकुळे, नितेश टिचकुले, ओंकार चवडे, शुभम चेटूले, अमित तुमसरे यांचे सहकार्य लाभले.