निवडणूक काळात होणारा मद्य, पैशाचा अवैध वापर रोखण्यासाठी सतर्क रहा-विक्रम पगारिया

0
17
????????????????????????????????????
  • निवडणूक खर्च विषयक विविध पथकांचा आढावा
  • अवैध दारू, पैशांविषयी नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन

वाशिम, दि. २० :  लोकसभा निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी मद्य, पैसा आणि इतर भेटवस्तूंचा वापर होऊ शकतो. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक खर्च विषयक सर्व पथकांची सतर्क राहून काम करावे, अशा सूचना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक विक्रम पगारिया यांनी दिल्या. लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या निवडणूक खर्च विषयक पथकांतील अधिकाऱ्यांच्या आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांच्यासह अपर जिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समितीचे नोडल अधिकारी दिनेशचंद्र वानखडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा निवडणूक खर्च विषयक समितीचे नोडल अधिकारी व्यंकट जोशी, सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक योगेश क्षीरसागर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, अनुप खांडे, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे, निवडणूक खर्च समितीचे युसुफ शेख यांच्यासह सर्व संबंधित पथकांचे प्रमुख उपस्थित होते.

श्री. पगारिया म्हणाले, निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी मद्य आणि पैसा तसेच इतरही भेटवस्तूंचे वाटप केले जाते. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्व्हेक्षण पथक (एसएसटी), व्हीडीओ सर्व्हेक्षण पथक (व्हीएसटी), व्हीडीओ पाहणी पथक (व्हीव्हीटी) यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. विशेषतः राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी परस्पर समन्वय ठेवून मद्यवाटपासारख्या बाबींवर करडी नजर ठेवावी. जिल्ह्याच्या सीमेवर तयार करण्यात आलेल्या तपासणी नाक्यांवर संबंधित स्थिर सर्वेक्षण पथकानेजिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करावी. शासकीय वाहन, रुग्णवाहिका, बसेस यांची सुद्धा तपासणी करणे आवश्यक आहे. भरारी पथकांनीही जिल्ह्यात काही ठिकाणी अचानकपणे तपासणी मोहीम राबवून वाहनांची तपासणी करावी. सीमेवरील तपासणी नाक्यांसोबतच जिल्ह्यांतर्गत इतर ठिकाणी सुध्दा वेळोवेळी तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये होणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवण्याची तसेच सभेदरम्यान आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी व्हीडीओ सर्व्हेक्षण पथकाची आहे. या पथकाने प्रचारसभांमध्ये होत असलेल्या प्रत्येक बाबींवरील खर्चाचे योग्य चित्रीकरण करून त्याची नोंद ठेवावी. तसेच ‘सी व्हीजील’ अॅप तसेच इतर माध्यमातून दाखल होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेवून त्यावर कार्यवाही करावी, अशा सूचनाही श्री. पगारिया यांनी यावेळी दिल्या.

अवैध मद्य, पैशाच्या वापराविषयी माहिती द्या : पगारिया

            यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी मद्य, पैसे अथवा भेटवस्तूचे वाटप होत असल्यास अथवा याबाबतची कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी आपल्या ९५३०४०००१५ अथवा ९०५७५०८२५० या भ्रमणध्वनीवर थेट संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन निवडणूक खर्च निरीक्षक विक्रम पगारिया यांनी केले आहे.