प्लास्टिकपासून बनलेल्या राष्ट्रध्वजाची विक्री, वापरास सक्त मनाई 

0
16

वाशिम, दि. २४ :  महाराष्ट्र दिन अर्थात १ मे रोजी विद्यार्थी, लहान मुले, व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी लहान आकारातील कागदी किंवा प्लॅस्टिकपासून बनलेले राष्ट्रध्वज खरेदी करतात. त्याच दिवशी सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी हे ध्वज इतस्ततः टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. प्लास्टिकपासून बनलेले हे ध्वज लवकर नष्ट होत नसल्यामुळे बरेच दिवस तेथेच पडून राहतात. त्यामुळे आपल्या हातून न कळत आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हा अवमान टाळण्यासाठी प्लॅस्टिकपासून बनलेले लहान राष्ट्रध्वज यांची विक्री व वापर करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने  करण्यात आले आहे.

राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान व विटंबना करणे हा दंडनीय अपराध आहे. वापरास उपयुक्त नसलेले, फाटलेले व जीर्ण, खराब झालेले किंवा रस्त्यावर, मैदानावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका व जिल्हास्तरीय निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेकडे सुपूर्द करावेत. यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, पालक व सर्वसामान्य नागरिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.