माथनीमध्ये स्फोटकाच्या गोदामात स्फोट, एकाचा मृत्यू

0
18

बुलडाणा,दि.27ः- खामगाव तालुक्यातील माथनी शिवारातील गोदामात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार (27 एप्रिल) दुपारी दीडच्या सुमारास घडली. स्फोट झालेल्या ठिकाणी असलेल्या प्रचंड धुरामुळे पोलीस आणि प्रशासनाला मदतकार्य करण्यास अडथळे येत असल्याची माहिती मिळत आहे. माथनी शिवारात स्फोटकाचे गोदाम आहे. वाढत्या तापमानाने या गोदामात शनिवारी दुपारी अचानक स्फोट झाला. यात गोपाळ मिसाळ नावाच्या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर चौधरी नावाचा एक कामगार जखमी झाला आहे. जखमी असलेल्या कामगाराला उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.