अमरावतीजवळ धावत्या मालगाडीच्या एका टँकरला आग

0
30

अमरावती,दि.३०:बावन्न टँकर पेट्रोलने भरून नेत असताना मालगाडीच्या एका टँकरला आग लागल्याची बाब बडनेरापासून जवळच असणाऱ्या टीमटाला रेल्वेस्थानकावर सोमवारी घडली. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या पेट्रोल टँकरला वेळीच विझविण्यात आले.
पानेवाडी येथून पेट्रोल भरून ५२ टँकरची मालगाडी लाखोडी येथे जात होती. या गाडीच्या इंजिनपासून २३ क्रमांकाच्या टँकरला आग लागल्याचे मालगाडीचे गार्ड एस.एम. मगर यांच्या लक्षात आले. त्यांनी वाकीटाकीद्वारे इंजिन चालक पी.व्ही. नगनारे, स्टेशन मास्तर सुनीता बोडखे यांना दिली. सदर माहिती टिमटाला स्टेशन मास्तर सतीश अढावू यांना दिल्यावर ही मालगाडी टीमटाळा रेल्वे स्थानकावर उभी केली. दरम्यान अमरावती येथुन अग्निशमन दलाचे बंब, बडनेरा रेल्वे पोलिस, गावकरी घटनास्थळी पोहोचले. तत्काळ रेल्वे प्रशासनाने ओव्हरहेड विद्युत पुरवठा खंडित केला व ज्या डब्याला आग लागली होती, त्याच्या समोरील व मागील टँकर मोकळे करण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी टँकरवर फोमचा मारा करून आग विझवली.
बडनेरा रेल्वे पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस.डी. वानखडे, कर्मचारी राहुल हिरोडे, राजू वऱ्हाडे, अग्निशमन दलाचे अमरावती येथील हर्षद दहातोंडे, सतीश घाटे, आकाश राऊत, धनराज कांदे, वैभव गजभारे, श्रेयस मेटे, अजय ढोके, नझीर अहमद, चांदूर रेल्वेचे अमोल कडू, मयूर घोडेस्वार, अविनाश यादव यासह रेल्वे प्रशासनाचे इतर अधिकारी, कर्मचारी, परिसरातील गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.