तीन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू

0
18

चंद्रपूर,दि.03ः- अंबुजा सिमेंट लेबर कॉलनीच्या मागील मंगी गावाच्या नाल्याकडे आंघोळीला गेलेल्या तीन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगी गावात २ मे रोजी ९.३0 वाजता घडली. सार्थक शशिकांत अल्हाट (१२) रा. अंबुजा सिमेंट कॉलनी उप्परवाही, मंजित विजय सिंग (१४),रा. उप्परवाही मेन गेट वॉर्ड क्रमांक. ३, शुभम दिवाकर गाजेरे (१४) रा. रामटेक जिल्हा नागपूर अशी मृतांची नावे आहे. अनुनय हा चौथा युवक बाहेरच असल्यामुळे त्याच्या जीव वाचला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
शुभम गाजेरे हा २२ एप्रिलला नातेवाईकांकडे सुट्टय़ा घालविण्याकरिता अंबुजा कॉलनीतील उप्परवाही येथे आला होता. गुरुवारी सार्थक, मंजित, शुभम आणि अनुनय हे चौघेही मंगी गावाच्या नाल्यात अंघोळीला गेले होते. तिघेही नाल्यात उतरले. मात्र काही वेळानंतर नाल्यात गेलेले त्याचे मित्र बाहेर न आल्याने अनुनय घाबरला आणि सरळ कॉलनीकडे धाव घेत घडलेली घटना सांगितली. सदर घटनेची माहिती अंबुजा सिमेंट सुरक्षा अधिकारी विलास नारखेडे यांनी गडचांदूर पोलिस स्टेशन येथे ११ वाजता कळविली. पोलिस घटनास्थळी पोहोचेपयर्ंत गावकर्‍यांनी तीनही मुलांचे मृतदेह बाहेर काढले होते. गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.