दलदलकुही व कोसबी येथे मजुरांसोबत घालवला अधिकार्यानी

0
17

गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ३० एप्रिल रोजी महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत कोसबी येथे एक दिवस मजुरांसोबत या संकल्पनेअंतर्गत ग्रामरोजगार दिवस साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे सालेकसा तालुक्यातील ग्रामपंचायत दरेकसा अंतर्गत दलदलकुही येथील मजुरासोंबत दिवस घालवून त्यांना  उपजिल्हाधिकारी रोहयो सुनील कोरडे,तहसीलदार सी.जी.पिट्टलवार ,गटविकास अधिकारी  पांडे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोसबी ग्रामपंचायत सरपंच अल्का रामटेके होत्या, तर उदघाटक म्हणून सडक/अर्जुनी नायब तहसिलदार श्री.खोकले उपस्थित होते. यावेळी सडक/अर्जुनी पं.स.विस्तार अधिकारी श्री.ऊगले, सहायक कार्यक्रम अधिकारी भारत बोदेले, शाखा अभियंता श्री.बंसोड, श्री.बिसेन, मंगेश मेश्राम, ग्रामसेवक नंदरधने, ग्रामरोजगार सेवक पिसाराम कापगते व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
मनरेगा अंतर्गत एक दिवस मजुरांसोबत या कार्यक्रमात सहायक कार्यक्रम अधिकारी बी.एम.बोदेले यांच्या हस्ते जॉबकार्ड पुस्तिकांचे वाटप करण्यात आले व सोबत सन २०१९-२० लेबर बजेटचे प्रमाणपत्र सरपंच यांना देण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.यावेळी श्री.उगले यांनी कृषि विषयक व जलयुक्त शिवार कामाविषयी ग्रामस्थांना माहिती दिली. भारत बोदेले यांनी नरेगाच्या कामाच्या नियोजनाविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन करुन कामाची रुपरेषा समजावून सांगितली व ज्या मजुरांनी १०० दिवस काम केले अशा मजुरांना कामगार कल्याण कार्यालयामार्फत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येतो असे त्यांनी सांगितले.
शाखा अभियंता श्री.बंसोड यांनी नरेगाच्या कामाविषयी ग्रामस्थांना माहिती दिली. एक दिवस मजुरांसोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष अल्का रामटेके यांनी कामगारांना कामगाराचे महत्व समजावून दिले आणि कामगारांना मिळणाऱ्या योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक श्री.भेलावे यांनी केले. उपस्थिताचे आभार ग्रामसेवक श्री.नंदरधने यांनी मानले.