शेतकर्‍यांचे धान उघड्यावर पडून

0
26

सालेकसा,दि.26ः-रब्बीची धान खरेदी आतापयर्ंत सुरु झाली नसल्याने मागील १0 दिवसांपासून अनेक शेतकर्‍यांचे धान गिरणीच्या परिसरात पडून आहे. अशात अचानक मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांना धान खराब होण्याची चिंता वाटत असून त्यांचे धान लवकर काटा करुन खरेदी करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे निवेदनातून केली आहे.
मागील १0 दिवसांपासून तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी रब्बी पिकाचे धान सहकारी भात गिरणी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर घेऊन गेले. परंतु संस्थेचे अध्यक्ष बाबुलाल उपराडे यांनी शेतकर्‍यांना सांगितले की सध्या गोदामात खरीप हंगामाचे धान भरलेले असून नवीन आवक झालेले धान मोजून ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही. अशात तालुक्यातील शेतकर्‍यांनी पुरवठा निरीक्षक रमेश कुंभरे यांची भेट घेऊन जुन्या धानाची लवकरात लवकर उचल करुन नवीन धान काटा करायला सुरुवात करावी व धान आपल्या अधीन करावे, अशी मागणी केली. धानाची उचल लवकर न केल्यास नुकसान होण्याची शक्यता वर्तविली. निवेदन देताना शंकरलाल मडावी, यादनलाल बनोठे, लटारु नागपुरे, परसराम फुंडे यांच्यासह तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.