“पाऊलखुणा” राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण उत्साहात

0
40

अर्जुनी/मोर,दि.26: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर च्या वतीने विश्वशांती बुद्ध विहार अर्जुनी/मोरगाव येथे स्व. अश्वस्थमा मेश्राम यांच्या स्मृती प्रित्यर्थ “पाऊलखुणा” राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.पहिल्या सत्रातील कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य आयोजक व उद्घाटक श्रीमती सुधा अश्वस्थामा मेश्राम यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यासाठी ४० गुणांची भव्य प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. वर्ग ५ ते १० च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभाग घेतला. प्रश्नमंजुषा स्पर्धेचे परीक्षण पी. एन. जगझापे सर, जे. एस. मेश्राम सर यांनी करून अधिक गुण घेणारे ३ विजेत्यांचे क्रमांक काढलेत. प्रथम – आर्यन अनिल मेश्राम, द्वितिय – कृतिका सांगोडे, तृतीय – शर्वरी संदेश शेंडे, मलिका कोचे (संयुक्त ) या विजेत्या स्पर्धकांना सुधा मेश्राम यांच्या हस्ते रोख रक्कम १००१,७०१, ५०१ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

‘पाऊलखुणा’ कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात स्व. अश्वस्थामा मेश्राम स्मृति प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बालकथा व काव्यलेखन स्पर्धा पुरस्कार वितरण समारंभास अध्यक्ष बाजीराव तुळशीकर सामाजिक कार्यकर्ता अर्जुनी/मोर, प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम, नागपूर, प्रमुख पाहुणे कवी संमेलनाध्यक्ष कवयित्री सौ प्रतिमा नंदेश्वर, मूल चंद्रपूर, प्रभाकर दहीकर, संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील, सचिव पल्लवी पाटील, नागपूर, आयोजक हंसराज खोब्रागडे, उद्घाटक सुधा मेश्राम, साहित्यिक मुन्नाभाई नंदागवळी , गोंदिया, लता मेश्राम चिमूर, सिद्धार्थ रामटेके सानगडी, परशराम गोंडाणे, प्रबोध धोंगडे, राजू नवनागे, नागपूर उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात समूहाचे मुख्य प्रशासक स्व अश्वस्थामा मेश्राम यांच्या शैक्षणिक कार्यप्रणालीवर प्रकाश टाकला.
आयोजन समितीतर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचे स्मृतीचिन्ह, पुष्प, विशेषांक, कवितासंग्रह व स्व.रंगनाथ लांजेवार यांचे साहित्य व “अर्पण” कवितासंग्रह देऊन सत्कार करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम यांनी विद्यार्थी व पालकांना मराठी माध्यमाचे महत्त्व पटवून देत आपला शैक्षणिक प्रवास आपल्या भाषणातून मांडला. बाजीराव तुळशीकर यांनी अशा प्रकारचे बौद्दिक, साहित्यिक व समाजसेवी कार्यक्रमाची गरज असल्याचे सांगितले.

राज्यस्तरीय बालकथा स्पर्धेतील श्री बाळू भाऊसाहेब नेहे, भैरव विद्यालय, घाटकोपर, मुंबई, बालकथा: उधारीचे पोते सव्वा हात रिते (प्रथम), सारीका मडावी आमगाव, गोंदिया बालकथा: दैववादी भीम (द्वितीय), डॉ मंजुषा साखरकर, ब्रह्मपुरी चंद्रपूर, बालकथा: प्राणीप्रेम (तृतीय) व काव्यलेखन स्पर्धेतील विजेते श्री विजय फुलबांधे ता. सडक अर्जुनी, जि गोंदिया(कविता- उतराई, प्रथम), श्री कल्याण राऊत, लातूर (कविता – तथास्तु, द्वितीय), कु. सरोज फुलझेले नागसेनवन, नागपूर (कविता – ओली माती तृतीय) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, विशेषांक व कवितासंग्रह देऊन सन्मानित करण्यात आले.

कवी संमेलनात कवयित्री सौ प्रतिमा नंदेश्वर, मूल यांच्या अध्यक्षतेखाली ३८ निमंत्रीत कवींनी आपल्या काव्यरचनांचे सादरीकरण केले. संस्थेच्या सचिव पल्लवी पाटील यांच्या हस्ते कवयित्री व आयोजक सुधा मेश्राम यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व निमंत्रीत कवींना सन्मानपत्र व संस्थेचे मुखपत्र असलेला विशेषांक भेट देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन संदेश शेंडे सर व वंदना कटरे यांनी केले तर आभार आयोजक कवी हंसराज खोब्रागडे यांनी मानले. याप्रसंगी साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येनी उपस्थित होती.