वडसा-गडचिरोली लोहमार्गासाठी ८० कोटींचा निधी

0
11

गडचिरोली, दि.३: बहुप्रतीक्षित वडसा-गडचिरोली या लाेहमार्गासाठी केंद्र सरकारने सुमारे ८० कोटी रुपये दिले असून, राज्य सरकारचा वाटा देण्याची ग्वाही देणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांना लिहिल्याचा दावा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषदेला आ.डॉ.देवराव होळी, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, जिल्हा सचिव डॉ.भारत खटी, अनिल पोहनकर, सुधाकर येनगंधलवार, गजानन येनगंधलवार, रेखा डोळस, स्वप्नील वरघंटे, शालीनी रायपुरे, डेडू राऊत, अविनाश विश्रोजवार, अनिल कुनघाडकर उपस्थित होते. खा. नेते यांनी सांगितले की, आपण नुकत्याच संपलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १२९ प्रश्न मांडले होते. शिवाय येत्या २० एप्रिलपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात १५० प्रश्न मांडणार आहोत. त्यात धानाला किमान अडीच हजार रुपये भाव द्यावा, गडचिरोली जिल्हयातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी द्यावा, बंगाली बांधवांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र द्यावे, वनजमिनीचे पट्टे देण्यासाठी गैरआदिवासींसाठी असलेली तीन पिढयांची अट रद्द करावी,तसेच ओबीसींना नोकरीतून हद्दपार करणाऱ्या अधिसूचनेत बदल करावा इत्यादी मागण्यांचा समावेश असल्याचे खा. नेते यांनी सांगितले. वनजमिनीच्या पट्टयासाठी तीन पिढयांची अट रद्द करावी, यासाठी आपण अशासकीय विधेयक मांडणार असून, आतापर्यंत स्वतंत्र विदर्भ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्यावे, सुशिक्षित बेरोजगारांना २ हजार रुपये भत्ता द्यावा व वनकायद्यात शिथिलता आणावी इत्यादी विधेयके मांडल्याचेही त्यांनी सांगितले.