डॉ.वर्षा खापर्डे यांना अखेर भंडाऱ्यातून अटक

0
9

भंडारा,दि.3: गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात दोन वेगवेगळया ठिकाणी उघडकीस आलेल्या अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या व गेल्या महिनाभरापासून फरार असलेल्या शासकीय वैदयकीय अधिकारी डॉ.वर्षा खापर्डे यांना आज एटापल्ली पोलिसांनी अखेर भंडारा येथील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. .
बिट्री येथील कैलास एडका वेलादी या युवकाने लग्नाचे आमीष दाखवून एका युवतीचे शारीरिक शोषण केले होते. यातून तिला गर्भधारणा झाली. पुढे कैलासने लग्नास देऊन पीडित युवतीला सुरुवातीला डॉ.खापर्डे यांच्या खासगी दवाखान्यात भरती केले. पंदेवाही टोला येथील एका नातेवाईकाच्या घरी नेऊन तिचा गर्भपात केला. शिवाय पुरावाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडित युवतीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरुन चौकशीअंती पोलिसांनी कैलास वेलादी, राजेश वेलादी, चैते वेलादी व डाॅ. वर्षा खापर्डे यांच्यावर कलम ३१३ व ३१८ अन्वये गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे, जानेवारी महिन्यात एकेर नाल्यात एक अर्भक आढळून आले होते. या प्रकरणाची चौकशी केली असता हे अर्भक एका शाळेतील कारकून व जारावंडीच्या एका महिलेच्या संबंधातून जन्मल्याचे लक्षात आले. शिवाय हा गर्भपात करण्यातही डॉ.खापर्डे यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. मात्र, डॉ.खापर्डे फरार होत्या. बिट्री येथील प्रकरणात न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. परंतु एकेर नाल्यातील अर्भकप्रकरणी जिल्हा न्यायालयाने २५ मार्च रोजी डॉ.खापर्डे यांचा अटकपूर्व जामीन नाकारला होता. घटनेपासून त्या फरार होत्या. त्यामुळे एटापल्ली पोलिस त्यांच्या मागावर होते. त्या भंडारा येथे असल्याची माहिती मिळताच एटापल्ली पोलिसांचे पथक तेथे पोहचले आणि आज सकाळी डॉ.वर्षा खापर्डे यांना अटक केली. पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली.
डॉ. वर्षा खापर्डे या एटापल्ली येथे बाल आरोग्य अभियान व आपत्कालिन पथकात वैदयकीय अधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या सहभागाविषयीचा अहवाल पोलिस अधीक्षक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठविल्यानंतर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी त्यांना यापूर्वीच निलंबित केले आहे.