मुख्यमंत्र्यांचे निर्देश : ७ हजार कर्मचाऱ्यांची वेतनकपात मागे

0
41

आमदार रहांगडाले यांचा पाठपुरावा

गोंदिया,दि.28 : विविध मागण्यांकरिता राज्यस्तरीय कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार ७,८ आणि ९ ऑगस्ट २०१८ हे तीन दिवस राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्यात आले होते. खुद्द मुख्यमंत्री यांच्या आश्वासनावरून संघटनांनी हे आंदोलन मागे घेतले होते. राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री यांनी वेतनकपात करण्यात येणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र राज्यात कोणत्याही जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची वेतन कपात झाली नसताना एकट्या गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कर्मचाऱ्यांची वेतन कपात करण्याचे फर्मान सोडले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर असलेल्या विविध संवर्गातील सुमारे ७००० कर्मचाऱ्यांचे तीन दिवसांचे वेतन कपात करण्यात आले. हा कर्मचाऱ्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी वेतन कपातीचा निर्णय मागे घेण्यात यावा याकरिता जिल्हा परिषद ते मंत्रालयापर्यंत धाव घेतली. शिक्षणमंत्री, ग्राम विकासमंत्री यांच्यासह आमदार खासदारांची भेट घेतली. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिरोडा येथे आले असता आमदार विजय रहांगडाले यांच्यामार्फत त्यांची भेट घेवून वेतन कपात मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले. आज(ता. २८) दुपारी एक वाजता मुंबई येथे आमदार विजय रहांगडाले यांनी वेतन कपातीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेतन कपात मागे घेण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. याचा लाभ जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर असलेल्या सात हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. या निर्णयाचे स्वागत शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, नूतन बांगरे, अनिरुद्ध मेश्राम, उमाशंकर पारधी, सुधीर बाजपेयी, नागसेन भालेराव, केदार गोटेफोडे, हेमंत पटले, विनोद लिचडे, यशोधरा सोनवाने, वाय. डी. पटले, नरेंद्र आगाशे, सुरेश रहांगडाले, दिनेश बोरकर, विनोद चौधरी, गौरीशंकर खराबे, ए. डी. पठाण, मोरेश्वर बडवाईक, सुशील रहांगडाले, मयूर राठोड, रमेश संग्रामे, विजय डोये, तोषीलाल लिल्हारे, अमोल खंडाईत, अयूब खान, श्रीधर पंचभाई, डी. आय. कटरे, शंकर नागपुरे, योगेश्वर मुंगूलमारे, शंकर चव्हाण, पवन कोहळे, जी. एस. ठूले, वाय. बी. पटले, ओमेश्वरी बिसेन, यशवंत भगत, बी. बी. ठाकरे, अरूण कटरे, अरविंद नाकाडे, दुर्गाप्रसाद कोकोडे तसेच सर्व जिल्हा आणि तालुका पदाधिऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

शिक्षक संघाच्या प्रयत्नांना यश

कर्मचाऱ्यांना लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घेण्याकरिता राज्यव्यापी संप करण्यात आला होता. त्या संपात शामील झाल्याचे कारण पुढे करून वेतनकपात करण्यात आली. यावर महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, विभागीय अध्यक्ष नूतन बांगरे, जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध मेश्राम यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार विजय रहांगडाले यांचे शिक्षक संघाने आभार मानले.