वृक्ष दिंडीला पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेविषयी जनजागृती

0
21
????????????????????????????????????

वाशिम, दि.30 : राज्य शासनाच्यावतीने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित वृक्ष दिंडीला आज पालकमंत्री संजय राठोड यांनी हिरवी झेंडी दाखविली. पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते वृक्ष पूजनानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून दिंडीला सुरुवात झाली.यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपवन संरक्षक सुमंत सोळंकी, सहाय्यक वन संरक्षक किशोरकुमार येळे, वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. नांदुरकर, जन्मेंजय जाधव यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पर्यावरण रक्षण व वनक्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम १ जुलै पासून सुरु होत आहे. या मोहिमेत लोकसहभाग मिळावा, याकरिता विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून वृक्ष दिंडी काढण्यात आली.

पालकमंत्री श्री. राठोड यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर अकोला नाका, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर दिंडीचा समारोप करण्यात आला. यादरम्यान चित्ररथ, पथनाट्य, लोकगीते व पोवाडा या माध्यमातून वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या वृक्ष दिंडीत जिल्हा स्काऊट आणि गाईड संघटन, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, नवोदय विद्यालय, बाकलीवाल विद्यालय, लॉयन्स विद्या निकेतन, रेखाताई शाळा व शिवाजी हायस्कूलचे विद्यार्थी तसेच स्वयंसेवी संस्थेचे सदस्य सहभागी झाले होते.