प्रधानमंत्री किसान मानधन योजना नाव नोंदणीसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम

0
12
  • १८ ते ४० वर्ष वयोगटातील अल्पभूधारक, सिमांत शेतकऱ्यांसाठी योजना
  • वयाची ६० वर्ष पुर्ण झाल्यानंतर मिळणार प्रतिमाह ३००० रुपये मानधन

वाशिम, दि. २१ : प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएम-केएमडीवाय) संपूर्ण देशात सुरु करण्यात आली आहे. १८ ते ४० वयोगटातील २ हेक्टर पर्यंत शेती असलेल्या सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकरी (एसएमएफ) या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत. पात्र लाभार्थ्यांना वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर ३ हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्याचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची सुध्दा तरतुद या योजनेत आहे. या योजनेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी २२ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०१९ दरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जाणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही एक एच्छिक तथा अंशदान पेन्शन योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्याला भारतीय जीवन बिमाद्वारे पेन्शन दिली जाईल. १ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यांना वयानुसार प्रतिमाह ५५ ते २०० रुपये रक्कम जमा करावी लागेल. सदर रक्कम ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. यात केंद्र शासनाकडून सुध्दा लाभार्थ्याद्वारे जमा केलेल्या रकमेऐवढी रक्कम जमा करण्यात येईल. गाव पातळीवर सुविधा केंद्रामध्ये (कॉमन सर्व्हिस सेंटर) लाभार्थी नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी करतेवेळी कोणतीही रक्कम लाभार्थ्याने भरण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १६८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

नोंदणीनंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून लाभार्थी हिश्याची रक्कम ऑटो-डेबीटने विमा कंपनीकडे जमा होईल. या योजनेत समाविष्ट होण्यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, गांव नमुना ८ अ व बँक पासबुक, बँक खाते क्रमांक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव इत्यादी माहिती सोबत आणावी. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचे पेन्शन कार्ड मिळणार आहे. शेतकऱ्यांची पडताळणी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे होणार आहे.

अल्पभूधारक व सिमांत शेतकरी (पती, पत्नी) वेगवेगळ्या पध्दतीने यात सहभागी होवू शकतात. वयाचे ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोघांनाही प्रतीमाह ३ हजार रुपये वेगवेगळ्या स्वरूपात प्रदान केले जाईल. ज्या शेतकऱ्यांनी ही योजना काही कारणास्तव बंद केली किंवा अर्धवट सोडली, अशा शेतकऱ्यांना त्यांनी जमा केलेली रक्कम व्याजासहीत परत दिली जाईल. इच्छुक शेतकऱ्यांनी याबाबत सुविधा केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.