ओबीसीं अटकेच्या निषेधासह पालकमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन

0
7

सालेकसा, दि.21ः: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३ आणि ४ ऑगस्ट रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यादरम्यान आपल्या घरी आणि कसलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसताना देखील ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्या अटकेचा निषेध करत पालकमंत्री डॉ. परिणय फुके सालेकसा येथे शासकीय कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांना २० ऑगस्ट रोजी ओबीसी महिला कार्यकर्त्यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देवून चर्चा करण्यात आली. निवेदनात म्हटले की, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी. ओबीसींच्या जनगणेसोबत मराठा आणि सवर्ण समाजाची देखील जात निहाय जनगणना करण्यात यावी. सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक तत्काळ घेण्यात यावी. सालेकसा नगर पंचायत अंतर्गत होत असलेल्या विविध विकास कामांतील भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी. सालेकसा शहरातील अंतर्गत रस्ते आणि सार्वजनिक जागेवरील सोयी सुविधा तत्काळ बहाल करण्यात यावे. शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आणि नच्चीअपन आयोगाची अमलबजावणी करण्यात यावी. सालेकसा तालुका पूर्व मंजूर कृषी उत्पन्न बाजार समिती बहाल करून इमारतीची स्थायी सोय होईपयंत तहसील कार्यालयाची जुनी इमारत याकामी उपयोगात आणण्यात यावी, आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी अनिता चुटे, विमल कटरे, ममता पटले, वर्षा साखरे, विद्या पाथोडे, मंजू मेंढे, निर्मला बागडे, शुभांगी डोये, वंदना डोये, अनिता पाथोडे, भागरथा ब्राम्हणकर, जीवनकला साखरे, सुग्रता सोनवाने, शीला जंगेरे आदींचा समावेश होता.