मिहान प्रकल्पासाठी ॲडव्हॉन्टेज परिषद- नितीन गडकरी

0
6

नागपूर : मिहानमध्ये जास्तीत जास्त कंपन्यांनी उद्योग सुरु करण्यासाठी मुंबई किंवा दिल्लीत मिहान ॲडव्हॉन्टेज परिषद आयोजित करण्यात यावी, अशी सूचना केंद्रीय परिवहन, महामार्ग, जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
रविभवन येथे आयोजित मिहान टास्क फोर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. श्री.गडकरी मिहान टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष आहेत. या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विमानतळ विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.पी.एस. मीना, मिहानचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, महापौर प्रवीण दटके, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार समीर मेघे, मिहानचे मुख्य अभियंता सुभाष चहांदे, उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा पठाण, प्रकाश पाटील, विदर्भ इंडस्ट्रिज असोशिएनचे पदाधिकारी, मिहान इंडस्ट्रिज असोशिएनचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
ज्या उद्योजकांनी मिहानमध्ये कंपनी सुरु करण्याकरिता जागा ताब्यात घेऊन ठेवली आहे. परंतु अजूनपर्यंत कोणताही उद्योग सुरु केलेला नाही. अशा कंपन्यांकडून जागा ताब्यात घेण्याऐवजी त्यांना पुढील तीन वर्षात उद्योग सुरु करण्याची संधी देण्यात यावी, असे मतही श्री.गडकरी यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारकडे मिहानसंदर्भात जे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्या प्रस्तावांना चालना देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येतील. मिहानमध्ये जे उद्योग सुरु आहेत किंवा भविष्यात सुरु होतील त्या उद्योगांमध्ये प्राधान्याने नागपूर शहर आणि जिल्ह्यातील कौशल्यप्राप्त तरुणांना प्राधान्याने रोजगार देण्यात यावा, असे आवाहनही श्री.गडकरी यांनी केले.
श्री.सत्रे म्हणाले, मिहान प्रकल्पातील विशेष आर्थिक क्षेत्रात 59 व आर्थिक क्षेत्राबाहेरील 22 अशा एकूण 81 कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यापैकी 18 कंपन्यांनी प्रत्यक्ष कामात सुरुवात केली असून काही कंपन्यांनी प्रकल्पाचे बांधकामास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे 5 हजार 500 लोकांना प्रत्यक्ष व 2 हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला आहे. मिहान प्रकल्पातील एसईझेडमध्ये अंदाजे 668 हेक्टर, सेझबाहेर अंदाजे 316 हेक्टर जमीन विक्रीसाठी शिल्लक आहे. मागील एक वर्षामध्ये सुमारे 65 उद्योजकांनी चौकशी केली असून त्यापैकी 15 उद्योजकांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे.

मिहानमध्ये पोलीस स्टेशन व अग्निशमन सेवा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. पोलीस स्टेशनची इमारत मिहानने बांधून द्यावी तसेच अग्निशमन सेवा पुरविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेशी करार करावा. महानगरपालिकेने पाण्याच्या पुनर्वापर प्रकल्पाचे पाणी मिहान प्रकल्पात देण्याबाबत प्राधान्याने विचार करावा. दूरध्वनी सेवेसाठी 4 जी नेटवर्क उपलब्ध करुन द्यावे. अशा सूचनाही बैठकीत करण्यात आल्या.