पुनर्वसनाच्या कामांना गती द्या – मालिनी शंकर

0
10

अमरावती : जिल्ह्यातील ज्या प्रकल्पांमध्ये पाणी आहे, तेथील नागरिकांना त्याचा लाभ मिळण्यासाठी पुनर्वसनाच्या कामांना गती देण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालक सचिव मालिनी शंकर यांनी दिले. तसेच पुनर्वसनाचे प्रश्न संवेदनशीलतेने व काळजीपूर्वक हाताळण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसनाबाबत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, प्रभारी अपर जिल्हाधिकारी राम सिद्धभट्टी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विनोद शिरभाते, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) पी.सी.घोलप, मुख्य अभियंता एच.ए. धांगरे, अधीक्षक अभियंता रवींद्र लांडेकर आदी उपस्थित होते.

पुनर्वसनात नागरी सुविधा पुरवित असताना त्याकडे केवळ एक स्ट्रक्चर म्हणून न पाहता नागरिकांच्या अडचणींचा विचार करुन तोडगा काढावा. पुनर्वसित गावांमध्ये रेशन दुकान, पिण्याचे पाणी आदी सुविधा प्राधान्याने देण्याच्या सूचनाही श्रीमती शंकर यांनी दिल्या.

किरण गित्ते यांनी जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. मोजणीची प्रक्रिया सहजसुलभ करण्यावर भर असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीसाठी महसूल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.