खाकी वर्दीतले रक्षक झाले भक्षक

0
9

अकोला – आपल्याला विरोध केल्याचा राग डोक्यात धरुन पोलिसांनी कापसी गावातील घरांत घुसून महिला व लहान मुलांसह अनेकांना बेदम मारहाण करत जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी गुंडगिरीचे प्रदर्शन केले आहे. गरोदर महिलेसह चार वर्षांच्या मुलालाही अमानुष मारहाण करत धूडगूस घातला. पोलिसांच्या या कृत्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळल्यामुळे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी घटनेची माहिती घेण्यासाठी कापसीकडे रवाना झाले आहेत.

दरवर्षी कापसी गावातील तलावाच्या काठी अक्षयतृतीयेनिमित्त जुगार खेळला जातो. या जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी काही पोलीस गावात पोहोचले. यावेळी जुगार खेळणाऱ्या व्यक्ती आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी त्यांना पकडण्यास सुरुवात केल्यावर या सर्व व्यक्ती गावातील वेगवेगळ्या घरात लपून बसल्या. त्यानंतर पोलिसांनी फौजफाटा बोलावून गावातील घरांमध्ये घुसून तेथील सर्वच लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी घरांचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला. तर महिला व मुलांसह अनेक निरपराध व्यक्तींना काठ्यांनी आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. काही घरांमध्ये जुगार खेळणाऱ्या व्यक्ती लपून बसलेल्या नसतानाही पोलिसांनी तिथेही घुसून निर्दोष गावकऱ्यांना जबरदस्त चोप दिला. पोलिसांच्या मारहाणीत एक गरोदर महिला आणि एक चार वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान पोलीसांना हप्ता न दिल्यानेच जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केल्याचा आरोप शिवसेना नेते गुलाबराव गावंडे यांनी केला. अकोल्याचे पोलीस अधीक्षक चंद्रशेखर मीना हे जिल्ह्यात दहशत निर्माण करत आहेत आणि सर्वांचा आवाज दाबण्याचे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.