न्यायाधीशांसह 15-20 जणांना चावा

0
13

अकोला दि. १५ : अकोल्यातील अकोट शहर सध्या एका वेगळ्याच दहशतीच्या सावटाखाली आहेत. भीतीमुळे येथील नागरिकांचे घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. अकोट शहरात सध्या एका पिसाळलेल्या माकडाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या माकडाने जवळपास १५ ते २० लोकांना चावा घेतला आहे.माकडाने चावा घेतलेल्यांमध्ये अकोट न्यायालयाचे न्यायमूर्ती विलास मोरे यांचाही समावेश आहे. वनविभागाने या माकडाला पकडण्यासाठी सध्या युद्धस्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत.
सध्या अकोटमध्ये माकडाची प्रचंड दहशत आहे. शहरातील सिंधी कॅम्प, इंदिरानगर, हिवरखेड रोड या भागात या पिसाळलेल्या माकडाची मोठी दहशत पाहायला मिळते. गेल्या महिनाभरापासून या माकडाचा त्रास या भागातील नागरिकांना होतो आहे. मात्र, गेल्या चार दिवसांत या माकडाने जवळपास दहापेक्षा अधिक लोकांना चावा घेतलाय. तर महिनाभरात चावा घेतलेल्या रुग्णांची संख्या जवळपास २० च्या घरात आहे. या माकडाच्या दहशतीने या भागांतील लोक दहशतीखाली आहेत. त्यामुळे बाहेर निघालेले नागरिक आपला जीव मुठीत घेवूनच बाहेर निघत आहेत.
दरम्यान, अकोला वनविभागाने या माकडाला पकडण्यासाठी सध्या युद्धस्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत. अकोला वनविभागाने या उच्छादखोर माकडाला पकडण्यासाठी जवळपास २० जणांचे पथक तयार केले आहे.