महावितरणचे कर्मचारी काळ्या फिती लावून कामावर

0
11

.. अन्यथा ५ जूनपासून कामबंद आंदोलन
गोंदिया दि. २७ : महाराष्ट्र शासन व वीज कंपनी व्यवस्थापनाच्या धोरणाविरोधात वीज क्षेत्रात कार्यरत संघटनांच्या कृती समितीने मंगळवारी (दि.२६) काळ्य़ा फिती लावून काम केले. तसेच द्वारसभेच्या माध्यमातून कृती समितीने निषेध नोंदवित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आवाज उठविला.
राज्यात उर्जाक्षेत्रात कार्यरत महावितरण कं पनीने विदर्भ, मराठवाडा, कोकण व पश्‍चिम महाराष्ट्र अशा चार प्रादेशिक विभागीय वीज कंपन्या स्थापित करण्याचे धोरण राज्याचे उर्जामंत्री यांनी नुकतेच जाहीर केले. याचा विरोध वीज क्षेत्रात कार्यरत संघटनांच्या कृती समितीने राज्य शासन व वीज कंपनी व्यवस्थापनाला पत्र पाठवून केला आहे. त्यानुसार शासन व व्यवस्थापनाने संघटनेशी चर्चा करणे अपेक्षीत होते. मात्रतसे न करता उलट सन २0११ मध्ये ठरविण्यात आलेल्या अटींची मोडतोड करून कर्मचार्‍यांना त्रास देण्याचे प्रकार केले जात आहेत. यामुळेही वीज कर्मचार्‍यांत रोष व्याप्त आहे. याकरिता प्रादेशिक विभागीय वीज कंपन्या स्थापित करण्याचे धोरण मागे घ्यावे, फिडर फ्रेंचाईसी विषयावर संघटनांशी चर्चा करावी व कर्मशियल परिपत्रक क्रमांक २३८ ची अंमलबजावणी थांबवावी, तिनही कंपन्यांतील बदली धोरण संघटनांशी चर्चा करून ठरवावे, मयत कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर शैक्षणिक पात्रतेनुसार पुर्वीप्रमाणे कायम पदावर नेमणूक द्यावी, सामान्य आदेश ७४ च्या तृतीय लाभासाठी रोजंदारी कामगारांची सेवा जेष्ठता ग्राह्य धरावी, तिनही कंपन्यांसाठी स्टाफ नॉर्मस्, सेटअप, कंझूमर नॉर्मस् ठरवावे, पारेषण कंपनीच्या व्यवस्थापना बरोबर झालेल्या चर्चेनुसार रिक्त जागा भराव्यात व पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात यावी.
सर्व वीज सेवकांना मेडिक्लेम योजना लागू करावी तसेच १७ मे रोजी कृती समितीच्या पत्रात नमूद मागण्या व प्रश्नांवर वाटाघाटी करून निर्णय घेण्यात यावा या मागण्यांसाठी वीज कर्मचार्‍यांनी मंगळवारी (दि.२६) काळी फित लावून काम केले. येत्या २६ व २८ तारखेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे हे विशेष.
मंगळवारी घेण्यात आलेल्या द्वारसभेला येथील हरीश डायरे, योगेश्‍वर सोनुले, विवेक काक डे, राजू गोंधरे, आनंद जैन, सुमित पांडे, प्रशांत वडसकर, विनय नेवारे, अनूप ढोके, चंद्रभान वाघ, धनराज शेंडे, मंगेश माडीवाले, राजू शालमाके, पी.पी. पिंपरामुळे, सौरभ गौरीवार, हिरेन मस्के, गणेश चव्हाण, पीयूष गोसेवाडे, निलम मेश्राम, अमय परसोकर, विवेक मते, विजय चौधरी व अन्य कर्मचारी उपस्थित होते.