सडक/अर्जुनी ते अर्जुनी/मोरगाव बससेवेचा शुभारंभ

0
12

गोंदिया, दि.२९ : पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज (ता.२९) सडक/अर्जुनी येथे सडक/अर्जुनी ते अर्जुनी/मोरगाव या बससेवेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. पालकमंत्र्यांनी सडक/अर्जुनी बस स्थानकाजवळ या बसला हिरवी झेंडी दाखविली. सडक/अर्जुनी ते कोहमारा दरम्यान २ कि.मी.चा प्रवास पालकमंत्र्यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने केला. यावेळी त्यांनी वाहकाकडून त्यांचे व सहप्रवाशांचे सडक/अर्जुनी ते कोहमारा दरम्यानचे तिकीट सुद्घा काढले. शुभारंभ प्रसंगी पं.स.चे उपसभापती दामोधर नेवारे, गोंदिया आगार प्रमुख गौतम शेंडे, पत्रकार हिदायत शेख, अपुर्व मेठी, जयंत शुक्ला यांचेसह नागरिक व महिला भगिनींची उपस्थिती होती. या बसचे चालक सुखदेव उईके व वाहक अरविंद रामटेककर यांना पालकमंत्र्यांनी बससेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
सडक/अर्जुनी येथून दररोज दुपारी १ वाजता आणि दुपारी ३.३० वाजता ही बस सडक/अर्जुनी-कोहमारा-नवेगावबांध-अर्जुनी/मोरगाव असा प्रवास करुन परत याच मार्गाने दिवसातून दोनदा धावणार आहे. त्यामुळे कामानिमीत्त व बाहेरगावी ये-जा करणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांना आता सुरक्षीत प्रवासाची हमी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमुळे मिळणार आहे. सडक/अर्जुनी ते अर्जुनी/मोरगाव दरम्यान बससेवा सुरु करण्यात यावी ही प्रवाशांची बरेच दिवसाची मागणी पालकमंत्र्यांनी पूर्ण केल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आवश्यक त्या ठिकाणी बससेवा सुरु करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.