जिल्ह्यात अखेर पाऊस बरसला

0
8

गोंदिया दि. १८: – : खरीप हंगामासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकर्‍यांना अखेर दिलासा देत पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. मंगळवारी संध्याकाळी गोंदियात जोरदार हजेरी लावणार्‍या पावसाने बुधवारीही जिल्ह्यातील अनेक भागात बरसून वातावरण ओलेचिंब केले. त्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात कुठे किती पाऊस पडला याची माहिती देणारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूम मात्र सध्या ‘आऊट ऑफ कंट्रोल’ असल्याचे दिसून आले. पावसाळ्याच्या दिवसात २४ तास या कंट्रोल रूममध्ये कर्मचार्‍यांची ड्युटी लावून सतत सतर्क राहणे गरजेचे असते. मात्र तिथे कुणाचेही कंट्रोल नसल्याचे दिसून येत आहे. बुधवारी पावसाचे आकडे देणेही तिथे उपस्थित कर्मचार्‍याला शक्य होत नव्हते.
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया तालुक्यात १५२.२ मिमी पाऊस पडला. मात्र ६५ पेक्षा जास्त पाऊस झाल्यास अतवृष्टी नोंदविली जाते.परंतु ही सामान्य बाबसुद्धा तेथे कार्यरत कर्मचार्‍यांना माहीत नव्हती. त्यांना याबाबत सांगण्यात आल्यावर ते संबंधित अधिकार्‍याला विचारण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी गोंदियात ३२ मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आल्याचे सांगितले.
शेवटी कृषी विभागाशी संपर्क केल्यावर पाऊस किती झाला याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे ही माहिती कंट्रोल रूममधून दोन्ही वेळा मिळालेल्या माहितीपेक्षा अगदी वेगळी होती. त्यामुळे कृषी विभागावर विश्‍वास ठेवायचा की जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूमच्या कर्मचार्‍यांवर? याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर असे पाणी साचले होते.