पशुधन अधिकार्‍यांचे चार महिन्यांपासून वेतन प्रलंबित

0
9

गोंदिया दि. १८:पशुसंवर्धन विभाग गोंदिया अंतर्गत येणार्‍या पशुधन अधिकार्‍यांचे तसेच तृतीय श्रेणी व चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचे वेतन चार महिन्यांपासून झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
चार महिन्यांपासून उधारीवर रेशन घेत असल्याने दुकानदार व इतर व्यापार्‍यांचे देणे वाढले आहे. या दुकानदारांनी आता उधारीवर रेशन देणे बंद केले आहे. वेतन न झाल्यामुळे एलआयसी, जीपीएफ यांच्या पॉलिसीचे मासिक प्रिमीयम वेळेवर भरले जात नसल्याने पॉलिसी बंद होण्याची भिती, किंवा नाहक अतिरिक्त भुर्दंड या कर्मचार्‍यांवर बसत आहे. तसेच सोसायटी व बँकेकडून घेतलेल्या कर्जावर अधिकचे व्याज बसत आहे.
पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ कर्मचार्‍यांकडून अतिरिक्त कामाची अपेक्षा करतात व वेळप्रसंगी कामासाठी त्यांना धारेवरही धरतात. परंतु हे काम उपाशीपोटी करणे शक्य आहे काय? ज्याप्रमाणे कर्मचार्‍यांकडून कामाची अपेक्षा करतात, त्याचप्रमाणे त्यांच्या वेतनाचीही व्यवस्था वेळेवर करणे गरजेचे आहे. कर्मचार्‍यांचे मन प्रसन्न असेल तर कामही चांगल्या प्रकारे होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
मुलांच्या परीक्षेचे निकाल लागले असून नवीन सत्र सुरु होण्याच्या मार्गावर आहे. मुलांचे गणवेश, पाठय़पुस्तके व खासगी शाळेत नाव दाखल करताना द्यावे लागणारे डोनेशन या सर्वांकरिता पैशाची गरज असते. परंतु हातात पैसाच नसेल तर या कर्मचार्‍यांची मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांनी व पालकमंत्र्यांनी या प्रकाराकडे लक्ष घालून संबंधित कर्मचार्‍यांचे वेतन लवकरात लवकर करण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे.