आमगाव, सालेकसा, देवरी तालुका व 11 निर्वाचक गणात दुपारी 3 पर्यंतच मतदान

0
5

मुंबई दि. २४ – : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा व देवरी हे तीन तालुके; तसेच अर्जुनीमोर आणि सडकअर्जुनी तालुक्यातील 11 पंचायत समिती निर्वाचक गणांमधील मतदानाच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता या ठिकाणी सकाळी 7.30 ते दुपारी 3 या वेळेतच मतदान होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, गोंदिया जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 30 जून 2015 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सर्व ठिकाणी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी होती; परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार आमगाव, सालेकसा व देवरी या तालुक्यातील मतदानाच्या वेळेत सकाळी 7.30 ते दुपारी 3 असा बदल यापूर्वीच केला आहे.

आता अर्जुनीमोर तालुक्यातील झाशीनगर, गोठणगाव, बाराभाटी, ताडगाव, महागाव, केशोरी व भरनोली; तसेच सडकअर्जुनी तालुक्यातील चिखली कोकणा-जमी, शेंडा व बाम्हणी/ख. या पंचायत समिती निर्वाचक गणातही आता सकाळी 7.30 ते दुपारी 3 या वेळेतच मतदान होईल.