विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्यपदी काँग्रेसचे किंमतकर

0
10

नागपूर,दि. २४-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्यपदी काँग्रेसचे मधुकरराव किंमतकर यांना कायम ठेवून धक्का दिला आहे. सिंचनावरून त्यांनी केलेल्या मदतीची सरकारने परतफेड केली. महाराष्ट्र भूषण डॉ. राणी व डॉ. अभय बंग यांचे चिरंजीव डॉ. आनंद आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी चांद्रायण यांचे पुत्र कपिल यांना संधी देऊन ‘जन-नेक्स्ट’चा ताळमेळ साधला. तथापि, मंडळाचे सेनापती अर्थात अध्यक्षांचा शोध अजूनही कायम आहे.

सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मंडळ, महामंडळांवरील पदाधिकारी बदलतात. पण, वैधानिक मंडळाच्या सदस्यपदी अॅड. किंमतकर यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षांपासून मंडळाचे ते तज्ज्ञ सदस्य आहेत. मंडळाच्या माध्यमातून आदिवासींपासून ते सार्वजनिक वितरण प्रणालीशी संबंधित अनेक प्रश्न त्यांनी लावून धरले आहेत. विशेषतः सिंचन आणि नोकऱ्यांमधील अनुशेषाबाबत त्यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेत सरकारला घेरले. विदर्भातील निधी पश्चिम महाराष्ट्राकडे कसा वळवला, याची माहिती उघड केली. आघाडीच्या काळात अर्थ, जलसंपदा व ऊर्जामंत्र्यांनी त्यांनी आव्हान दिले. धारणी येथे आदिवासी क्षेत्रात कुपोषणाबाबत काम करणारे डॉ. रवींद्र कोल्हे, अनाथ मुलांसाठी काम करणारे वणी येथील ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे डॉ. किशोर मोघे यांचीही तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.