भाजपलाच मिळणार पूर्ण बहुमत-दानवे

0
7

भंडारा दि. २६:: भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणार्‍या पंचायत समितींवर पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचारार्थ आले असता ते पत्रपरिषदेत बोलत होते.
यावेळी खा.दानवे म्हणाले, वर्षभरापूर्वी झालेली लोकसभा निवडणूक व सहा महिन्यापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मतदारांनी भाजपलाच कौल दिला आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे कामकाज तसेच मागील पाच वर्षात भंडारा जिल्हा परिषद आणि भाजपची सत्ता असलेल्या पंचायत समितीने केलेल्या कामांच्या बळावर याहीवेळी जिल्हा परिषद व पंचायत समितींवर भाजपची सत्ता येईल, असा विश्‍वास त्यांनी बोलून दाखविला. जनसामान्यांपर्यंत विकासाची कामे पोहोचली पाहिजेत, यासाठी पक्षपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले, संपूर्ण राज्यात १ कोटी ५ लाख सदस्य नोंदणी झाली आहे. ग्रामीण भागातही भाजपची सदस्यसंख्या मोठय़ा प्रमाणात करण्यात आली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात भाजपने उमेदवारी देताना निवडून येण्यायोग्य उमेदवारांनाच उमेदवारी दिल्याचे सांगून कोणताही भेदभाव करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले. उमेदवारी न दिल्याने काहींनी अन्य पक्षात प्रवेश केलेला आहे, त्यांच्याशी भाजपचा आता कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खा.पटोले म्हणाले, या निवडणुकीत केंद्राचा व राज्यात सुरू असलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचविणार असल्याचे सांगून अर्बन बँकेच्या निवडणुकीत आम्ही आमचे अधिकृत पॅनेल नाही, त्यामुळे आमच्या नावाचा कुणी वापर करीत असल्यास ते चुकीचे आहे. पत्रपरिषदेला खासदार नाना पटोले, माजी खासदार शिशुपाल पटले, आमदार रामचंद्र अवसरे, संघटक महामंत्री रामदास आंबटकर, उपस्थित होते.