शाहू महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करूया- सुधीर मुनगंटीवार

0
11

चंद्रपूर दि २६: दीन, दलित, शोषित, पीडित व गोरगरिबांच्या यशाच्या मार्गात येणारे स्पीडब्रेकर दूर करण्यासाठी आपण सदैव मदत करणार असून आजच्या दिवशी छत्रपती शाहू महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात श्री. मुनगंटीवार बोलत होते. जि. प. अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, सभापती देवराव भोंगळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, उपायुक्त जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती दिलीप राठोड, सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, संशोधन अधिकारी विजय वाकुलकर, समाज कल्याण अधिकारी पुष्पा आत्राम आदी उपस्थित होते.

सामजिक न्यायाच्या दृष्टीने आपण वर्षभर काय केले याचे मूल्यमापन करण्याचा हा दिवस असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, हुशार, गुणवंत व होतकरु मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या आड गरिबी येता कामा नये म्हणून भारतीय प्रशासकीय पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचा मुख्य परीक्षेचा खर्च करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज वाचनालय उभारण्यात येणार आहे. ज्या गरीब व्यक्तीला घर नाही त्यांना जागा घेण्यासाठी 50 हजाराचे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आल्याचे ते म्हणाले. या वर्षी सामाजिक न्याय विभागाला 1200 कोटी रुपयांचा निधी विकासासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

महाराष्ट्र सशक्त करायचा असेल तर प्रत्येक जिल्हा सशक्त केला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात विकास परिषद घेण्यात येणार असून याची सुरुवात बल्लारपूरपासून होत आहे. यासाठी लोकांच्या सूचना, कल्पना घेतल्या जाणार आहेत. ज्यांच्याकडे चांगल्या सूचना व कल्पना आहेत त्यांचे स्वागत केले जाईल, असेही ते म्हणाले. छत्रपती शाहू महाराजांचा एक गुण जरी अंगी बाळगला तरी आपले जीवन धन्य होइल. आजचा दिवस समरसतेच्या मार्गाने जाण्याचा असून सामाजिक न्यायाचा संकल्प करण्याचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुणवंत विद्यार्थी, आंतरजातीय विवाह करणारे जोडपे व अपंग दाम्पत्य यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रीमती गुरुनुले यांनी विविध योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. डॉ. म्हैसेकर यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला.

प्रसाद कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत पाटील यांनी केले तर आभार समाज कल्याण अधिकारी पुष्पा आत्राम यांनी मानले.