राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्यायासाठी आदर्श- डॉ.विजय सूर्यवंशी

0
8

गोंदिया दि २६: समाजातील शोषित, पिडीत, वंचित व मागास घटकांच्या कल्याणासाठी त्या काळात शाहू महाराजांनी काम केले. त्यांच्या कल्याणासाठी महाराजांनी प्रसंगी संघर्षही केला. समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने शाहू महाराज हे आदर्श आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.

राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून सामाजिक न्याय भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, दलितमित्र डॉ.जे.डी. राऊत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम आदी उपस्थित होते.

डॉ.सूर्यवंशी म्हणाले, त्याकाळी विषमतेचे वातावरण असताना सामाजिक न्यायाची सुरुवात शाहू महाराजांनी केली. ती त्यांनी प्रत्यक्षात देखील आणली. शासन आज सामाजिक न्यायाचे अनेक उपक्रम व योजना राबवित आहे. याचा लाभ खऱ्या अर्थाने गरजू लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे. वंचित व उपेक्षीत असलेल्या समाजातील शेवटच्या घटकाला लाभ देण्याच्या दृष्टीने शाहू महाराजांची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील युवक-युवतींनी प्रशासनात येऊन जनतेची सेवा करावी. यासाठी या युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचा विचार आहे. समाजातील उपेक्षीत घटकांना न्याय देण्यासाठी यंत्रणांनी काम करावे, असेही ते म्हणाले.

श्री.गावडे, श्री.पाडवी, दलितमित्र श्री.राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले. आभार श्री. पेंदाम यांनी मानले.