अमरावती विभागात पीएसआयची १३६ पदे रिक्त

0
14

अमरावती,दि. ४:विभागातल्या पाच जिल्ह्यांमध्ये पोलिस उपनिरीक्षकांची १३६ पदे रिक्त आहेत. या पदासह अन्य काही रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे ठोस आश्‍वासन गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी अमरावतीत दिले.आढावा बैठकीसाठी येथे आलेल्या प्रा. शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्‍नांना उत्तरे दिली. विभागात अप्पर पोलिस अधीक्षकांची ६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी दोन पदे रिक्त आहेत. पोलिस उपअधीक्षकांची २९ पदे मंजूर असून त्यापैकी १९ पदांवरच अधिकारी आहेत. पोलिस निरीक्षकांची १३५ पदे आहेत. त्यापैकी १२ रिक्त आहेत. सहायक पोलिस निरीक्षकांची २५९ पदे विभागात मंजूर असून त्यापैकी ३३ पदे रिक्त आहेत. पोलिस उपनिरीक्षकांची ४६२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३२६ पदांवर अधिकारी आहे. उर्वरित १३६ पदे रिक्त आहेत. ही संख्या बरीच मोठी आहे. शासनाने त्याची दखल घेतली. पीएसआयची १६३ जणांची नवीन तुकडी आताच बाहेर पडली आहे. त्यातील काही पीएसआय या विभागात नियुक्त करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच उर्वरित रिक्त पदांच्या भरतीसाठी शासन संवेदनशील असून लवकरच ही सर्व पदे भरण्यात येतील. कलम १०७, १०९, ९३, ५६, ५७ अतर्ंगत दारू विक्रेत्यांवर दाखल होणार्‍या गुन्ह्यांसंदर्भात पुढची कठोर कारवाई करण्याचे अधिकार ग्रामीण भागात महसूल विभागाला देण्यात आले आहेत. त्यात लवकरच सुधारणा करण्यात येणार असून पोलिस उपअधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांना अधिकार देण्यात येणार आहे. तसेच अवैध दारू विक्री व अन्य गुन्ह्यांसंदर्भात सूचना देऊनही योग्य कारवाई न झाल्यास पोलिस अधीक्षकांना जबाबदार धरणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. रिक्त पदे, पोलिस वसाहती, कार्यालये, कारवाई या संदर्भातले वेगवेगळे अहवाल शासनाला पाठविण्याचे आदेशही आज देण्यात आल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.