बिबट झाला जेरबंद

0
5

नवेगावबांध ,दि.१५: ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेल्या बोंडे या गावी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक बिबट कोंबड्यावर ताव मारण्यासाठी आला. परंतु नागरिकांनी हुशारीने त्याला खोलीत डांबून ठेवले. वन्यजीव विभागाच्या पथकाने त्याला पिजऱ्यांमध्ये जेरबंद करून नंतर त्याला जंगलात सोडून देण्यात आले. सदर घटना सोमवार व मंगळवारच्या रात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे की, जंगलालगतच्या गावांमध्ये कोंबड्या, बकऱ्या व कुत्र्यांची शिकार करण्यासाठी रात्रीच्या सुमारास बिबट येतात. ही नित्याचीच बाब झाली होती. बोंडे येथेदेखील अनेकांकडे कोंबड्या व बकऱ्या पाळल्या जातात. बिबट्याला मात्र गावातील कोंबड्याची शिकार करण्याची चटक लागली. रविवारच्या रात्रीदेखील सदर बिबट गावामध्ये आला व याने खुशाल काशिवार यांच्या घरची कोंबडी फस्त केली. बिबट्याला मात्र हमखास शिकार मिळण्याचे ठिकाण माहीत झाले होते. सोमवारच्या रात्रीदेखील १२.३० वाजताच्या सुमारास बिबट्या आला व कोंबड्या ठेवलेल्या खोलीत शिरला.

बिबट्या नक्की येणारच अशी खात्री ठेवून स्थानिक नागरिक खुशाल काशिवार आणि त्यांची चमू बिबट्याच्या पाळतीवरच होते. बिबट्या खोलीमध्ये शिरताच त्यांनी खोलीचे दार बाहेरून बंद केले. यानंतर घाबरून बिबट्या खोलीच्या सज्जावर जावून बसला.

यानंतर भ्रमणध्वनीवरून वन्यजीव विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तदेखील लावण्यात आला होता. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात शिरला व सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

बोंडे या गावाशेजारी फारसे जंगलदेखील नाही. मग बिबट्या येथे कसा आला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. वास्तविकपणे जंगली प्राण्यांना जेव्हा जंगलात पुरेसे अन्न खायला मिळत नाही तेव्हाच ते आपले अधिवास सोडून गावामध्ये प्रवेश करतात, असे वन्यजीव प्रेमी व नागरिकांचे म्हणणे आहे.