35.4 C
Gondiā
Sunday, May 18, 2025
Home Blog Page 5683

मुख्यमंत्र्यानीही केला अवयव दानाचा संकल्प

0

मुंबई,दि.30- अवयवदान हे मोठे सामाजिक काम असून प्रत्येक गरजू रुग्णांना अवयव मिळाला पाहिजे. अवयवदात्याची गरज असलेले मोठ्या प्रमाणात रुग्ण असून प्रत्येकाने अवयवदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करुन स्वत:ही अवयवदानाचा संकल्प केला. आज नरिमन पाँईट, मरीन ड्राईव्ह येथे आयोजित महाअवयवदान अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत,पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण आदि उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, डोळे, किडनी, यकृत, फुप्फुस, त्वचा हे अवयव आपण दान करु शकतो. आपण आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान करुन अंध व्यक्तीच्या जीवनात नवा प्रकाश देऊ शकतो. या अवयवदानाचे महत्त्व घराघरांत पोहोचले पाहिजे. आज येथे उपस्थित सर्व मंत्री, डॉक्टर्स यांनी आणि मी स्वत: अवयवदानाचा संकल्प केला आहे. आपणही सर्वांनी आजच्या दिवशी अवयवदानाचा संकल्प करुन अर्ज भरावा. महाजन यांनी प्रास्ताविकातून या अवयवदान मोहिमेची संकल्पना सांगितली. ते म्हणाले की, भारतामध्ये अवयवदानाच्या प्रतिक्षेत हजारो रुग्ण आहेत. त्यांना जर अवयव मिळाले तर त्यांचे आयुष्य सुंदर होणार आहे. अवयवदान करुन आपण अनेकांना जीवनदान देऊ शकतो. या अवयवदानाचे महत्त्व सर्वांना कळावे, स्वत:हून अवयवदान करण्यासाठी पुढे यावे म्हणून हे अभियान राज्यभर राबविले जात आहे. आपण सर्वांनी अवयवदानाचे महत्त्व समजून हा संदेश समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवावा.
डॉ. सावंत यावेळी म्हणाले की, समाजाची गरज ओळखून राज्य शासनामार्फत हे महाअवयवदान अभियान २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत राबविले जाणार आहे. किडनीबाबत काही गैरप्रकार घडत असून हे टाळण्यासाठी एका सॉफ्टवेअरची निर्मिती करीत आहोत. ब्रेनडेड व्यक्तीचे अवयव गरजू रुग्णांना त्वरीत मिळावेत. यातील कालावधी कमी व्हावा म्हणून आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.
या महाअवयवदान अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. या रॅलीत अवयवदानाचे महत्त्व सांगणारे शेकडो फलक हातात घेऊन विद्यार्थी, डॉक्टर्स, नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

जिल्हयातील ८३७७ रुग्णांसाठी राजीव गांधी आरोग्य योजनाठरली जीवनदायी

0

गोंदिया,(berartimes.com) दि. ३० :-कोणताही आजार हा श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव करीत नाही. श्रीमंत व्यक्तीला जर हृदयरोग,मुत्रपिंड,मेंदू,व मज्जासंस्थेचे आजार झाले तर, तो त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे महागडे उपचार व शस्त्रक्रिया करु शकतो. परंतु जे व्यक्ती गरीब आणि दारिद्रय रेषेखाली जीवन जगत आहेत अशांना जर हृदयरोग ,मेंदु,मज्जासंस्थेचे विकार आणि मुत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता पडली तर त्यांना महागडे उपचार व शस्त्रक्रिया करणे आर्थिकदृष्टया शक्य होत नाही. अशा परिस्थितीमुळे त्यांना शेवटपर्यत आजारांना सोबत घेऊन जीवन जगावे लागते. जिल्हयातील गोरगरीब दारिद्रय रेषेखाली जीवन जगणा-या रुग्णांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ख-या अर्थाने जीवनदायी ठरली आहे. आता ही योजना ४ ऑगस्ट २०१६ पासून महात्मा फुले जन आरोग्य योजना म्हणून राज्यात लागू झाली आहे.
राज्य शासनाने एक महत्वपुर्ण निर्णय घेऊन दारिद्रय रेषेखाली जीवन जगणा-या व्यक्तिला हृदयरोग,मेंदु,मज्जासंस्थांचे विकार आणि मुत्रपिंडाच्या प्रत्यारोपणाचे उपचार व शस्त्रक्रियेसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. जिल्हयातील तब्बल ८३७७ रुग्णांसाठी ही योजना जीवनदायी ठरली आहे. जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील या योजनेअंतर्गत निवड केलेल्या खाजगी व शासकिय रुग्णालयातून या रुग्णांनी उपचार व शस्त्रक्रिया केल्या आहेत. या रुग्णांच्या आजारावरील महागडे उपचार व शस्त्रक्रियेचा खर्च राज्य शासनाने केल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ दारिद्रय रेषेखालील पिवळया शिधापत्रिकाधारक कुटुंबाबरोबरच अंत्योदय अन्न्‍ योजना,अन्नपुर्णा शिधापत्रिकाधारक आणि दारिद्रय रेषेवरील केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारक कुटुंबे ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लक्ष रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशी आरोग्य ओळखपत्रे असणारे कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
२१ नोव्हेंबर २०१३ ते २८ ऑगस्ट २०१६ या कालावधीत जिल्हयातील ८३७७ रुग्णांवर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत जिल्हयात व जिल्हयाबाहेरील रुग्णालयात उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावर १६ कोटी १३ लक्ष २१ हजार ७१५ रुपये खर्च करण्यात आले. या योजनेअंतर्गत जळालेले रुग्ण ,कार्डिओलॉजी,क्रिटीकल केअर,ईएनटी सर्जरी,इन्डोक्रीनोलॉजी ,जनरल मेडिसीन,गॅस्टड्ढो ऐन्टड्ढोलॉजी ,जनरल सर्जरी, जेनेटोरिनरी सिस्टिम, गायनॉकोलॉजी ॲण्ड ऑबस्टेस्टड्ढीक्स,सर्जरी, नेफ्रोलॉजी,न्युरॉलॉजी, न्यूरोसर्जरी,ऑप्थॅलमोलॉजी सर्जरी, ऑर्थोपेडीक सर्जरी ॲण्ड प्रोसिजर्स , पेडिॲटड्ढीक सर्जरी, पेडिॲटड्ढीक मेडिसीन मॅनेजमेंट,पॉलीटड्ढॅऊमा, प्रोस्थेसीस, पलमोनोलॉजी, रिमॅथोलॉजी , सर्जीकल ग्रॅस्टो एन्टरोलॉजी, व सर्जीकल ऑनकोलॉजी अशा प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
जिल्हयात या योजनेअंतर्गत उपचार व शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आलेल्या खाजगी , व शासकिय रुग्णालयातून २६२८ रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या उपचार व शस्त्रक्रियेचा खर्च ३ कोटी ८० लाख १५ हजार ४०० रुपये, तर जिल्हयाबाहेरील खाजगी , विश्वस्त संस्थांचे रुग्णालय व शासकिय रुग्णालयातून जिल्हयातील ५७४९ रुग्णांनी उपचार व शस्त्रक्रिया केल्या. यासाठी शासनाने १२ कोटी ३३ लाख ६ हजार ३१५ रुपये रुग्णांवर खर्च केले. जिल्हयातील उपचार व शस्त्रक्रिया केलेल्या २०५१ रुग्णांचा २ कोटी ५९ लक्ष १७ हजार ५५१ रुपये आणि जिल्हयाबाहेर उपचार व शस्त्रक्रिया केलेल्या ४६४६ रुग्णांचा ९ कोटी ९ लाख १६ हजार २४५ रुपये खर्च शासनाने संबंधित रुग्णालयांना दिला आहे. उर्वरित ५७७ व ११०३ रुग्णांवरील उपचार व शस्त्रक्रियेचा खर्च देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्हा ओबीसी संघटनेचे पंतप्रधानांना निवेदन

0

ब्रह्मपुरी : आरक्षण, क्रिमिलेयर, शिष्यवृत्ती व जनगणनेबाबत शासन- प्रशासनाकडून ओबीसी समाजावर प्रचंड अन्याय होत आहे. यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाविरुद्ध समाजात संतापाची लाट उसळली आहे. या अन्यायाच्या विरोधात जनआंदोलन उभारण्यात येणार असून त्याची पूर्वसूचना म्हणून प्रा. नामदेव जेंगठे यांच्या नेतृत्वात ओबीसींचे शिष्टमंडळ तहसीलदार यांना भेटले. पंतप्रधान व सामाजिक न्यायमंत्री यांना तहसीलदारांमार्फत मागण्यांचे निवेदन दिले.
शिफारशीनुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आले असले तरी क्रिमिलेअरच्या घटनाबाह्य निकषामुळे व सक्षम अधिकारी यांचा चुकीचा अर्थ लावत असल्यामुळे ओबीसींना या आरक्षणाचा नगण्य फायदा होत आहे. तेच जातिनिहाय जनगणना, स्कॉलरशिप, ट्युशन फी, विकास निधी याबाबत शासनाची नकारघंटा आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने स्पष्टीकरण पत्र देवूनसुद्धा अधिकारी हेतुपूरस्पर चुकीचा अर्थ काढून नान क्रिमिलेअरमध्ये ओबीसींची अडवणूक करीत आहे. परिणामी युपीएससी २0१६ मध्ये रॅकींग झालेल्या जवळजवळ १२0 ओबीसी उमेदवारांची पोस्टींग अडवून त्यांना सनदी अधिकारी बनण्यापासून वंचित केले आहे. तसेच स्वतंत्र मंत्रालय, मतदारसंघ संख्येनुसार आरक्षण जातसूचीमध्ये बोगस ओबीसी यासारख्या ज्वलंत प्रश्नाकडे शासन हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत आहे. परिणामी केंद्र सरकारने ओबीसींच्या २७ टक्के जागांपैकी आजपर्यंत केवळ ५.५ टक्के जागा भरल्या आहेत. ओबीसींवर होत असलेल्या अन्याय- अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ओबीसी संघटनेने पंतप्रधान व सामाजिक न्यायमंत्री यांना उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत मागण्यांचे निवेदन दिले असून जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.
सदर शिष्टमंडळात प्राचार्य श्याम झाडे, प्राचार्य गिरीधर लडके, प्रा. राकेश तलमले, प्रा. डॉ. हितेंद्र धोटे, प्रा. अनिल कोडापे, प्रा. विजय पारधी, प्राचार्य सुभाष मेश्राम, अँड. हेमंत उरकुडे, अतुल राऊत, बंटी गोंडाणे, जगदिश पिलारे, पियुष गेडाम, आकाश राऊत, रवी मिसार आदी सहभागी झाले होते.

इलेक्ट्रोहोम्योपॅथी पदवीधारकांचे डीएचओ,पोलीस अधिक्षकांना निवेदन

0

गोंदिया(berartimes.com):- जिल्हातील इलेक्ट्रोहोम्योपॅथी पदवीधारकांनी मेडीकल अशोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोम्योपॅथी जिल्हा गोंदिया च्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ के जी तुरकर यांच्या नेतृत्वात उप मुख्य कार्यपालन अधीकारी आर एल पुराम यांच्या उपस्थीतीत मा जिल्हा आरोग्य अधीकारीयांना निवेदन देण्यात आले.तसेच पोलीस अधिक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनाही निवेदन देण्यात आले.जिल्हात बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरु असल्याने ईएच च्या पदवीधारकांवर पोलीस प्रशासनाकडुन बोगस म्हणुन कार्यवाही करीत आहेत हि कार्यवाही त्वरीत थांबविण्यात यावी त्याकरीता पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णया नुसार व शासनाच्या खुलाशा नुसार ईएच पदवीधारक एम एम पी अॅक्ट १९६१अंतर्गत नोंदणी शिवाय व्यवसाय करु शकतात म्हणुन होणार्या कार्यवाहीवर तोडगा काढण्याकरीता निवेदन देण्यात आले.
न्यायालयाच्या निर्णया नुसार आपल्यावर बोगस म्हणुन कार्यवाही होणार नाही पण आपण आपल्या पॅथी मध्येच प्राक्टीस करावे व आरोग्य विभागाला सहकार्य करुन रुग्णांची माहीती द्यावी. त्याच प्रमाणे संघटनेकडुन ईएच पदवीधारकांची यादी लवकरात लवकर आरोग्य विभागाला देण्यात यावे जेणेकरुन आढावा बैठकीत आपला प्रश्न मार्गी सोडवून बोगस डॉक्टरच्या यादीतुन ईएच पदवीधारकांचे नाव वगळण्याचे आश्वासन आरोग्य अधिकारी यांनी दिली.यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ गणेश हरीणखेडे सचीव डॉ संतोष येवले सहसचीव डॉ बी एम पटले कोषाध्यक्ष डॉ राजेश तिवारी समन्वयक डॉ विनोद भगत डॉ सी एस भगत डॉ ओ टी भैरम डॉ गणेश बिसेन डॉ डोये डॉ बहेकार डॉ संदीप तुरकर डॉ एस एफ कटरे डॉ डी एल पटले डॉ जे टी रहांगडाले डॉ तरोणे डॉ ए के सैय्यद व गोंदिया जिल्यातुन सर्व तालुक्याचे पदाधीकारी व ईएच पदवीधारक असे दोनशे लोक ह्यावेड़ी प्रामुख्याने उपस्थीत होते।

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात अनुकंपा पदभरतीस मान्यता – बबनराव लोणीकर

0

मुंबई : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील (एमजेपी) लिपिक-टंकलेखक पद भरतीवरील निर्बंध शिथील करुन गट- क मधील लिपिक-टंकलेखकांच्या एकूण रिक्त पदांच्या १० टक्के पदांवर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्यास प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

श्री.लोणीकर म्हणाले, राज्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गट- क ची १ हजार ४९३ इतकी मंजूर पदे असून, त्यापैकी ८९४ पदे भरण्यात आली आहेत. ५९९ पदे रिक्त आहेत. याउलट राज्यभरात एमजेपीअंतर्गत ५०५ अनुकंपा उमेदवार सध्या नेमणुकीच्या प्रतिक्षेत आहेत. यात गट-क साठी ३११ तर गट ड साठी १९४ अनुकंपा उमेदवार हे अर्हताप्राप्त आहेत. मागील काही वर्षात विविध प्रशासकीय कारणास्तव एमजेपीमधील अनुकंपा तत्त्वावरील पदभरती ही पूर्णत: थांबली होती. पण आता अर्हताप्राप्त अनुकंपा उमेदवारांना १० टक्के रिक्त जागांवर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले.

सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या निराधार कुटुंबास अनुकंपा तत्त्वाच्या आधारे दिलासा देण्याच्या हेतूने शासनामार्फत ही योजना राबविली जात असून एमजेपी कर्मचारी मात्र मागील काही वर्षापासून त्यापासून वंचित होते. आता यापुढील काळात ही पदभरती विनाविलंब केली जाईल, असे श्री.लोणीकर म्हणाले.

पीएमजीएसवाय कंत्राटी अभियंत्याच्या आंदोलनाला अॅड. अणेंचा पाठिंबा

0

गोंदिया,(berartimes.com)दि.29-कार्यस्थळापासून गावाकडे निघालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कनिष्ठ अभियंता रुपेश दिघोरेसह राज्यात यापुर्वी सुध्दा मृत्यूमुखी पडलेल्या अभियंत्याच्या घटनेनंतर राज्यातील सर्व पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील कंत्राटी अभियंत्यानी आपल्या नोकरीची पर्वा न करता सरकारच्या धोरणाविरोधात 25 आॅगस्टपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.हे आंदोलन 2 सप्टेंबरपर्यत राहणार आहे.त्यानंतर सरकारने मागण्या मंजुर झाल्या नाही तर 6 सप्टेबंरपासून नागपूरातील सविंधान चौकात बेमूदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
पीएमजीएसवायमधील अभियंत्यानी सुरु केलेल्या आंदोलनाची दखल विदर्भ राज्य आघाडीचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी अॅटर्नी जनरल अॅड.श्रीहरी अणे यांनी तुमसर येथे आपल्या सभेकरीता आले असता समर्थन जाहिर केले.सरकारने दखल न घेतल्यास विदर्भ राज्य आघाडी सुध्दा 6 सप्टेबंरपासूनच्या आंदोलनात पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कंत्राटी अभियंत्याच्या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवणार अशी ग्वाही पीएमजेएसवायच्या शिष्टमंडळाला दिली आहे.विदर्भ विकास आघाडीचे समन्वयक कमलेश भगतकर यांनी कंत्राटी अभियंत्याच्या समस्या जाणून घेऊन अॅड.श्रीहरी अणे यांच्यासोबत चर्चा घडवून आणण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.कंत्राटी अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत सोनवाने(पुणे),उपाध्यक्ष विकास डेकाटे(वर्धा),सचिव हर्षवर्धन पाटील तसेच वर्धेचे रोकडे,रत्नागिरीच्या चित्रा सावंत,नागपूरचे आशिष कराडे व संदेश बागडे,नंदुरबारचे पंकज विस्पुते,बीडचे विनोद जाधव,औरगांबादचे एस.आर.थडकर,पुण्याचे चंदु करंडे,चेतन शिंदे,भंडाराचे दिपक वैद्य,गडचिरोलीचे किरण नेमा,मुंगसे,अमरावतीचे अमित संघानी,यवतमाळचे अली,चंद्रपूरचे पाडेवार,गोंदिया अरविंद बिसेन,भुपेश तुरकर,राजेश येळे,मनोज काळे यांनी शासन स्पष्ट निर्णय जोपर्यंत घेत नाही,तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे कळविले आहे.

नागरीकर हल्ला प्रकरणातील आरोपीवर मकोका लावा

0

गोंदिया : तालुक्यातील नागरा येथील प्रतिष्ठीत नागरिक तथा भाजपा कार्यकर्ते राजेश नागरीकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाèया आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून नागरा येथील अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे, अशी मागणी भाजपातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देवून करण्यात आली.
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांची भेट घेवून त्यांना नागरा येथील हल्ला प्रकरण व अवैध व्यवसायामुळे नागरा या धार्मिक गावातील होणारी भंग होणारी शांतता त्यांच्या निर्देशनास आणून दिली. दरम्यान मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते राजेश नागरीकर यांच्यावर आरोपी प्रितलाल उर्फ मुन्ना पतेहै रा. नागरा व त्याच्या साथीदारांनी २७ ऑगस्ट रोजी रात्री दीडच्या सुमारास राजकीय व सामाजिक व्देषातून प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने यात ते बचावले. आरोपी हा नागरा येथे जुगार, दारू, गांजा विक्रीचा अवैध व्यवसाय चालवित असून याविरोधात यापूर्वी भाजपा कार्यकत्र्यांनी अनेकदा आवाज उठविला व पोलीस विभागाला तक्रार केली. आरोपी प्रितलाल पतेहै याच्यावर यापूर्वी देखील अनेक प्रकरणी पोलिसात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अवैध व्यवसायामुळे व गुंडगिरीमुळे नागरा येथील धार्मिक वातावरणाला तडा जात असून गावातील शांतता भंग होत आहे. याबाबत आपण पोलीस विभागाकडे वारंवार तक्रार करीत असल्याने, तसेच राजकीय व सामाजिक व्देषातून राजेश नागरीकर यांच्यावर आरोपीने प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे या आरोपींवर मकोका अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी. तसेच नागरा येथील अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे.
निवेदन देतांना भाजपा माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, राजेश नागरीकर, संजय मुरकुटे, सुभाष मुंदडा, पंकज सोनवाने, अजीत टेंभरे, अरqवद हरडे, गणेश पारधी, नोखलाल पाचे, मदनलाल चिखलोंडे, रणजितqसह गौर, दिनदयाल गायधने, अनिल रहांगडाले, योगेंद्र हरिणखेडे, बाबा चौधरी, देवानंद पटले, परसराम हुमे, मगनलाल ढेकवार, राजकुमार ढेकवार, बिहारीलाल लिल्हारे, मुकेश भेदरे, घनश्याम लिल्हारे, महेश चिखलोंडे, तेजलाल बघेले, नरेश बघेले, धन्ना बडगे, दिगंबर बनोटे, प्रदिप चौधरी, धनलाल बघेले, लक्ष्मण चौधरी, रूपेश दमाहे, दुर्गेश भोयर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र विधीमंडळात “जीएसटी’ मंजूर

0

वृत्तसंस्था
मुंबई – महाराष्ट्र राज्याने आज (सोमवार) संसदेने संमत केलेल्या वस्तु व सेवा कर (जीएसटी) विधेयकास मान्यता दर्शविली. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) मांडलेल्या या विधेयकास सर्व राजकीय पक्षांनी मान्यता दर्शविली. विधानसभा व विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांत या विधेयकास आवाजी मतदानाने समर्थन दर्शविण्यात आले. जीएसटीस मंजुरी दर्शविणारे महाराष्ट्र हे देशातील दहावे राज्य आहे.

“जीएसटीमुळे केवळ “मेक इन इंडिया‘ मोहिमेस पाठिंबा मिळेल असे नव्हे; तर या विधेयकामुळे भारत एक बाजारपेठ होण्यास मदत होईल. जीएसटीमुळे देशातील वेगवेगळ्या स्वरुपाची कर आकारणी करणाऱ्या राज्यांमधील स्पर्धाही संपुष्टात येईल,‘ असे मत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील प्रस्ताव विधानसभेत मांडताना व्यक्त केले.

उत्पादन व सेवा क्षेत्रांसहित ग्राहकाभिमुख व्यवसाय क्षेत्रामध्येही आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रास या विधेयकामुळे विशेष फायदा होईल, असे अर्थमंत्री म्हणाले. देशाच्या एकूण सेवा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा वाटा तब्बल 19.62% असल्याचे निरीक्षण मुनगंटीवार यांनी या पार्श्‍वभूमीवर नोंदविले. जीएसटी प्रणालीमध्ये राज्यातील एकूण 17 कर एकत्रित केले जाणार आहेत. यामध्ये मूल्यवर्धित कर (व्हॅट), जकात आणि इतर अनेक स्वरुपाच्या करांचा समावेश आहे. याचबरोबर, मद्य, मुद्रांकशुल्क आणि वीज या क्षेत्रांत कर (लेव्ही टॅक्‍स) आकारण्याचा राज्याचा अधिकार अबाधित राहणार आहे.

30 आॅगस्टपासून महा अवयवदान अभियान

0

गोंदिया, दि.२९ :- नाविन्यपुर्ण तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी प्रत्यारोपणाव्दारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहे. अवयवदानाअंतर्गत लाईव्ह ऑरगन डोनेशनव्दारे किडनी व लिव्हर प्रत्यारोपण करण्यात येते. मस्तिष्क स्तंभमृत पश्चात किडनी, लिव्हर, लग्ज, हार्ट व त्वचा इत्यादी अवयव दान करण्यात येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अवयव दानाचे महत्व जाणून रुग्णसेवेसाठी मोठया प्रमाणात अवयवदान जागृती करण्यासाठी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.अजय केवलिया यांनी पत्रकार परिषदेत आज सोमवारला दिली.पत्रपरिषदेला जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्यासह वैद्याकिय महाविद्यालयाचे प्रा.डाॅ.कांबले,प्रा.डाॅ.रुखमोडे,डाॅ.जायस्वाल यांच्यासह वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.
सद्यस्थितीत राज्यात सुमारे १२ हजार पेक्षा जास्त रुग्ण अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. जनतेतून अवयवदानाला चालना मिळावी यासाठी ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०१६ या कालावधीत महा अवयवदान अभियान- २०१६ राबविण्यात येणार आहे.
या अभियानात महा अवयवदानाबाबत जागृती करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, उच्च व तंत्र शिक्षण, महसूल, गृह, माहिती व जनसंपर्क या विभागाच्या सहकार्याने व समन्वयाने विविध उपक्रम राविण्यात येणार आहे.
मानवाला डोळे, त्वचा, यकृत, दृदय मुत्रपिंड व प्लिहा यासारख्या अवयवांची भेट मिळाली आहे. निसर्गाने दिलेली ही अवयवरुपी भेट मृत्यूनंतरही इतर गरजू रुग्णांना दान करता येवू शकते. मृत्यूच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या अनेक रुग्णांना अवयवदानामुळे दुसरे जीवन जगण्याची संधी मिळू शकते.
महा अवयवदान अभियानातून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होवून अवयवदान करावे व मृत्यूच्या उंबरठयावर असलेल्या असंख्य रुग्णांना जीवनदान दयावे असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया यांनी केले आहे. अवयवदानाचे महत्व जाणून रुग्णसेवेसाठी अवयवदान करुन अनेक रुग्णांना जीवन जगण्याची संधी मिळवून देणा-या महा अवयवदान अभियानानिमित्त ३० ऑगस्ट रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८.३० वाजता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येथे गोंदिया शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी तसेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे विद्यार्थी,अधिकारी,प्राध्यापक व कर्मचारी वर्ग एकत्र होतील. तेथून अवयवदानाची जनजागृती करीत रॅली नेहरु चौक, गोरेलाल चौक, शहर पोलिस स्टेशन, गांधी पुतळा, जयस्तंभ चौक, जिल्हा न्यायालय मार्गे बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालय येथे पोहोचेल. या रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थी अवयवदानाचे महत्व पटवून देणा-या घोषणा देतील.मुलांच्या हाती असलेले संदेश फलक अवयवदानाचे महत्व पटवून देतील.
३१ ऑगस्ट रोजी शासकीय महाविद्यालय येथे सकाळी ८.३०ते सायंकाळी ६ वाजेपर्यत महा अवयवदान या विषयावर रांगोळी स्पर्धा, अवयवदान-महान कार्य या विषयावर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत शासकीय महाविद्यालयाचे व्याख्यान कक्षात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२.३० वाजता अवयवदान- महान कार्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा तसेच पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्घे सहभाग घेऊ इच्छिणा-या स्पर्धकानी आवश्यक साहित्य सोबत आणावे.
१ सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येथे सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत रक्तदान शिबीर, अवयवदान अभियानाअंतर्गत मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा या विषयी कायदेतज्ञ व न्यायवैद्यकशास्त्र तज्ञ यांचे व्याख्यान, अवयवदान नोंदणी शिबीर,अभियानाअंतर्गत उत्कृष्ठ काम करणा-यांचा सत्कार व महा अवयवदान जनजागृती अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे.

जलयुक्त शिवार ही लोकसहभाग मिळालेली यशस्वी योजना-मुख्यमंत्री फडणवीस

0

औरंगाबाद,दि.29,- जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यात तसेच मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठे निर्माण झाले असून राज्यामध्ये जलयुक्त
शिवार ही लोकसहभाग मिळालेली सर्वांत मोठी योजना असल्याचे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.ते फुलंब्री येथे जलयुक्त शिवार योजनेतगंत लोकसहभागातून झालेल्या फुलमस्ता नदी
खोलीकरण कामांचे जलपुजन प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे,कामगार,भूकंप पुनवर्शसन कौशल्य विकास ,माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,खा.रावसाहेब दानवे,विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट,जिल्हावधकारी डॉ. निधी पांडेय,एकनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की शासनाने राज्य पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी ही योजना सुरु केली.2019 पर्यंत राज्यातील पाणी टंचाई दूर करणाचे उविष्ट ठेवले असून राज्यात 20 हजार गावापैकी 4 हजार 500
गावे जलयुक्त झाली आहेत. या अभियानासाठी राज्यातील तज्ञ लोकाचे मार्गदर्शन मिळत असून हे अभियान सर्वत्र यशस्वी होत आहे.
गावातील सर्व लोक एकत्र येऊन लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियानात प्रभावीपणे सहभाग नोंदवीत आहेत. जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात जलस्वातंत्र्याची क्रांती होत आहे. यामुळे मराठवाड्यात
परिवर्तन घडून येत असून पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे. 2018 पर्यंत राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींना डिजीटल करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत मंत्रालयस्तरापर्यंत जोडली जाईल. 17 हजार शाळा डिजीटल झाल्या असून सर्व शाळा डिजीटल स्वरुपाच्या करण्यात येतील.
जिल्हावधकारी डॉ. निधी पांडेय यांनी जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानसभा अध्यक्ष श्री बागडे यांच्या उपस्थितीत फुलंब्री नहरालगत असलेल्या फुलमस्ता नदीचे जलपुजन करण्यात आले.