नागपूर जिल्ह्यात माझी नगरपरिषद संकल्पना राबविणार- जिल्हाधिकारी कृष्णा

0
8

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील 14 नगरपरिषदांमध्ये ‘माझी नगरपरिषद’ व ‘नगरपरिषद दिनदर्शिका’ असे दोन कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी केले.

जिल्ह्यातील 14 नगरपरिषदांमधील विकास कामांना गती व दिशा देण्यासाठी 2015-16 या वर्षात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामाचे नियोजन कसे करावे? यासंदर्भात बचत भवन येथे झालेल्या कार्यशाळेत जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा मार्गदर्शन करीत होते.

कार्यशाळेत नगरपरिषदांमधील अभियंते, लेखापाल, विभाग प्रमुख, मुख्याधिकारी, नगरपरिषद प्रशासन विभागाचे प्रभारी अधिकारी प्रकाश शर्मा आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, माझी नगरपरिषद ही संकल्पना राबविताना नगरपरिषदांमधील कार्यालय कामकाज दर्जा सुधारणा, अंतर्गत व बाह्य स्त्रोतांच्या माध्यमातून उत्पन्न वाढविणे, स्वच्छता राखणे, पाणीपुरवठ्याचा दर्जा वाढविणे, दिवाबत्ती, रस्ते, शिक्षा, स्वास्थ्य याकडे विशेष लक्ष देणे एबीएम एजन्सीद्वारे विकसित सॉफ्टवेअर कार्यान्वित करणे, ईमेल आयडी दररोज तपासणे याबाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

नगरपरिषद मुख्याधिकारी व्हॉट्स ॲपवर

नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी व्हॉट्स ॲपवर गट तयार करुन अंतर्गत एकमेकांशी तसेच वरीष्ठ कार्यालयाशी सतत संपर्कात राहून संवाद वाढवण्यावर विशेष भर देण्याचे निश्चित केले आहे. यासोबतच सर्व विभागप्रमुखांना लॅपटॉप तसेच मुख्याधिकाऱ्यांना आयपॅड उपलब्ध करुन देण्याबाबत तातडीने पावले उचलण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

नागरिकांच्या तक्रारीसाठी एसएमएस पद्धत

नगरपरिषदेतील रहिवाशांच्या तक्रारींची दखल एसएमएसद्वारे घेण्यात यावी. यासाठी एसएमएस पद्धत सुरु करावी. शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा, वरीष्ठ कार्यालयातील सर्व संबंधिताचे दूरध्वनी क्रमांक तसेच ई-मेल आयडी सर्वांना उपलब्ध करुन देणे, या व इतर पद्धतींचा अवलंब माझी नगरपरिषद या संकल्पनेत मांडण्यात आला आहे.

नगरपरिषद दिनदर्शिका

नगरपरिषदांमध्ये मार्च व एप्रिल महिन्यात करावयाच्या कामांची दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. त्यानुसार मार्च महिन्याच्या 11 ते 15 तारखेपर्यंत पाणी टंचाई आराखडा, अंदाजपत्रक सादर करणे. 15 ते 20 तारखेपर्यंत अखर्चीत निधीचा आढावा घेऊन खर्चाचे नियोजन, अपुर्ण कामे पूर्ण करण्याचे नियोजन, दिनांक 21 ते 31 या तारखांना पूर्ण झालेल्या कामांचे मोजमाप करुन त्याचे मूल्य अदा करणे व उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे.

एप्रिल महिन्यात 1 ते 3 तारखेपर्यंत नगरपरिषद वसुलीची माहिती. 4 ते 7 तारखेपर्यंत विभिन्न योजनेच्या कामांचे प्रारुप तयार करणे, 7 ते 10 तारखेपर्यंत प्रस्तावावर चर्चा व मंजुरीसाठी सभेसमोर ठेवणे. दिनांक 11 ते 15 प्रस्ताव मंजूर टप्प्यासह संबंधित वरीष्ठ कार्यालयास पाठविणे. दिनांक 15 ते 30 या तारखेत ई गव्हर्नन्सचे सर्व मॉड्युल्सचा पूर्ण वापर करणे, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत यंत्रणा बळकटीकरण, पॉलिथीन निर्मूलन, पाणी टंचाई व अग्निशमन व्यवस्थापन याबाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.