हुर्रेकसा चकमकीत वरिष्ठ नक्षली ठार

0
10

गडचिरोली, -: धानोरा तालुक्यातील चातगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील हुर्रेकसा येथे तब्बल आठ तास चाललेल्या चकमकीत एक महिला नक्षली ठार झाली. मृत नक्षली ही नक्षल्यांच्या चातगाव एरिया कमिटीची सचिव रजिता किंवा रज्जो गावडे असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दोन दिवसांपूर्वी चातगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत महावाडा येथे चकमक उडाली होती. त्यानंतर काही नक्षली हुर्रेकसा गावात लपून असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबविणे सुरु केले. काल(ता.८)रात्री आठ वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युतर दिले. या चकमकीत ठार झालेली व्यक्ती ही नक्षल कमांडर किंवा त्यापेक्षा मोठ्या दर्जाची व्यक्ती असून, ती चातगाव एरिया कमिटीची सचिव रजिता उर्फ रामको ऋषी उसेंडी किंवा रज्जो गावडे असावी, असा व्यक्त केला. मात्र, खरी ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तीन नक्षलवादी एका दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर होते. तेथून त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. सर्वप्रथम पोलिसांनी त्या घरातील कुटुंबीय व शेजारच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले व त्यानंतर कारवाई केली. या कारवाईत रजिता किंवा रज्जो ठार झाली. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक एके ४७ रायफल, एक ३०३ रायफल, कॅमेरा फ्लॅश, काडतुसे, पिट्टू, पुस्तके व अन्य साहित्य जप्त केल्याची माहिती संदीप पाटील यांनी दिली.  पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे व महेश्वर रेड्डी उपस्थित होते.