ग्राहकांना चांगल्या सेवेसोबतबेरोजगार अभियंत्यांना रोजगार देणार- ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
9

ऊर्जाविषयक बाबींचा आढावा

गोंदिया,दि.१८ : वीज ग्राहकांना चांगला वीज पुरवठा करणे हे आमचे कर्तव्य आहे. जिल्ह्यातील वीजेसंदर्भातील अनेक प्रश्नांची सोडवणूक लवकरच करुन जिल्ह्यातील बेरोजगार असलेल्या इलेक्ट्रीक अभियंत्यांना वीज वितरण कंपनीचे विविध कामे उपलब्ध करुन देऊन त्यांच्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आज १८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ऊर्जाविषयक विविध समस्यांचा आढावा घेतांना ऊर्जामंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, खा.नाना पटोले, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार गोपालदास अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पशुसंवर्धन व कृषी समिती सभापती छाया दसरे, समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, कृषी पाणी संजीवनी योजना सुरु करुन ज्या पाणी पुरवठा योजना बंद आणि काही बंद होण्याच्या मार्गावर आहे अशा योजनांना शासन ५० टक्के मदत करणार. यापुढे जळालेले, नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी तालुक्याच्या बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. ही दुरुस्तीची कामे त्याच उपविभागातील बेरोजगार अभियंत्यांना व आयटीआय बेरोजगारांना उपलब्ध करुन देण्यात येईल. ६ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना शेतीतील जळालेले ट्रान्सफार्मर बदलून दयावे. उपविभागीय अभियंत्याच्या कार्यालयात एक ट्रान्सफार्मर भवन उभारुन बेरोजगार अभियंत्यांना कामे उपलब्ध करुन दयावे.
१५ लाखाची ५ कामे बेरोजगार इलेक्ट्रीक अभियंत्यांना १ वर्षात उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगून श्री.बावनकुळे म्हणाले, ज्या ठिकाणी उपकेंद्र उभारण्याची आवश्यकता आहे तेथे जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातून जमीन उपलब्ध करुन देण्यात येईल. वीजेची हानी कमी होऊन वीज बील वसूलीसाठी वीज वितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे. वीज बील चुकीचे देणाऱ्या कंपनीची चौकशी करुन उपअभियंता कार्यालय मार्फत कामाचे विकेंद्रीकरण करण्यात येईल असेही ते म्हणाले.
गोंदिया जिल्ह्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वीज वितरण कंपनी करणार असून आवश्यक तेवढा निधी त्यासाठी देण्यात येईल असे सांगून ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्यात येईल. शेतकऱ्यांना सिंचनासाठी नदी, नाले, कालवे व तलावातून पाणी द्यायचे असल्यास मागणीनुसार तेथे वीज कनेक्शन देण्यात येईल. वीज वितरणचे जे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसतील त्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्याचे निर्देश त्यांनी अधीक्षक अभियंत्याला यावेळी दिले. ५ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना वीज बील संकलनाचे काम कमिशनवर देण्यात येईल.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील वीज पुरवठा एक्सप्रेस फिडर नादुरुस्तीमुळे बंद राहतो. त्यामुळे रुग्णांना प्रसंगी जीव गमवावा लागतो. वीज पुरवठ्या अभावी केटीएस रुग्णालयात श्री.लोणारकर या तरुणाला जीव गमवावा लागला. यात दोषी असल्यास अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री.धामनकर, सहायक अभियंता श्री.पांडे व उप कार्यकारी अभियंता श्री.शेख यांची चौकशी करुन निलंबीत करण्यात यावे असे निर्देशही मुख्य अभियंता श्री.रेशमे यांना दिले.
पालकमंत्री बडोले म्हणाले, वीज वितरण कंपनीची कोणती कामे बेरोजगार इलेक्ट्रीक अभियंत्यांना करता येईल यासाठी जिल्हास्तरावर बेरोजगार अभियंत्यांचा मेळावा घेण्यात यावा. नादुरुस्त वाकलेले विद्युत खांब त्वरित दुरुस्त करुन लोंबकाळलेल्या विद्युत तारा व्यवस्थीत कराव्या. वीज वितरणच्या अपघातामुळे प्राणहानी व वित्तहानी झालेल्यांना त्वरित मदत करण्यात यावी. विद्युत निरीक्षकांनी याची तपासणी करुन ३ दिवसात अहवाल दयावा असेही ते म्हणाले.
खा.पटोले म्हणाले, ग्राहकांना वीज कनेक्शन वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे काही ग्राहक वीज चोरी करतात. ही चोरी टाळण्यासाठी वीज कनेक्शनची मागणी करताच तातडीने कनेक्शन देण्यात यावे. मिटर रिडींग घेऊनच वीज ग्राहकांना बील देण्यात यावे. वीज ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्याचेही त्यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना सूचविले.
आ.अग्रवाल म्हणाले, गोंदिया शहर व तालुक्यातील विजेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करुन पुढील २५ वर्षाचा १०० कोटीचा वीज आराखडा तयार करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह प्रमाणे वीज सुरक्षा सप्ताहाचे सुद्धा जिल्ह्यात विविध शाळा, महाविद्यालय व विविध ठिकाणी आयोजन करुन वीज सुरक्षेचे महत्व विद्यार्थी व जनतेला पटवून देण्यात येईल. त्यामुळे वीज हानी व जिवीत हानी टाळण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
आढावा सभेला वीज वितरण कंपनीचे नागपूर येथील मुख्य अभियंता प्रसाद रेशमे, महापारेषणचे संचालक श्री.एम्पाल, महापारेषणचे मुख्य अभियंता श्री.बहादुरे, पायाभूत आराखड्याचे अधीक्षक अभियंता व्ही.व्ही.शहारे, स्थापत्य अधीक्षक अभियंता आर.आर.जनबंधू यांचेसह भाजपाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नारायण निमजे, वीज वितरण कंपनीचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच वीज समस्येबाबत विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने व नागरिकांनी आपल्या तक्रारी यावेळी ऊर्जामंत्र्यांकडे मांडल्या. यावेळी अधीक्षक अभियंता कबीरदास चव्हाण यांनी जिल्ह्यातील ऊर्जाविषयक बाबीचे सादरीकरण करुन उपस्थितांचे आभार मानले.
००००