वीज वितरणाचे जाळे मजबूत करणार- ऊर्जामंत्री बावनकुळे

0
12

हिवरा येथे अतिरिक्त रोहित्राचे उदघाटन

गोंदिया,दि.१८ : जिल्ह्यातील वीज ग्राहकांना आणि शेतकरी बांधवांच्या कृषी पंपाना चांगला वीज पुरवठा झाल्यास शेतीतून सिंचनाच्या आधारे दुबार व तिबार पीक घेता येईल. जनता ही ग्राहक असून चांगला वीज पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात वीज वितरणचे जाळे मजबूत करणार.असे प्रतिपादन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
आज १८ ऑगस्ट रोजी गोंदिया तालुक्यातील हिवरा येथील ३३/११ के.व्ही. उपकेंद्राच्या ५ एमबी अतिरिक्त रोहित्राचे उदघाटन करतांना ऊर्जामंत्री बावनकुळे बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार नाना पटोले, आमदार गोपालदास अग्रवाल, जि.प.अध्यक्षा उषा मेंढे, जि.प.कृषी समिती सभापती छाया दसरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, पंचायत समिती सभापती स्नेहा गौतम, जि.प.सदस्य शैलजा सोनवणे, हिवरा सरपंच संजीव लिल्हारे यांची उपस्थिती होती.
ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, जिल्ह्यात पुढील पाच वर्षात २५० ते ३०० कोटी रुपये निधी खर्च करुन वीजेच्या विविध समस्या सोडविण्यात येतील. बेरोजगार असलेल्या इलेक्ट्रीक अभियंत्यांना कामे उपलब्ध करुन देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देता येईल. चांगल्याप्रकारची वीज ग्राहकांना व उद्योगांना मिळाली तर मेक इन महाराष्ट्रातून अनेक उद्योग सुरु होतील असे सांगून श्री.बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना वीज देणे काळाची गरज आहे. वीजेतून सिंचन निर्माण झाल्यास शेतकरी समृद्ध होईल. वीज वितरण ही ग्राहकांना चांगली सेवा देणारी कंपनी म्हणून भविष्यात नावारुपास येईल. जनतेला चांगल्याप्रकारचा वीज पुरवठा करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना पालकमंत्री बडोले म्हणाले, या रोहित्राच्या लोकार्पणामुळे या भागातील वीज समस्या काही बाबतीत सोडविण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी वर्षातून दोन ते तिनदा पिके घेत असल्यामुळे चांगली वीज मिळाली तर भरघोस उत्पादन घेऊन समृद्धी येण्यास मदत होईल. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केंद्राकडून १ हजार कोटी रुपये राज्यातील वीजेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मिळविले असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
खा.पटोले म्हणाले, वीज ही मुलभूत गरज झाली आहे. चांगले ऊर्जेचे स्त्रोत निर्माण करुन चांगली वीज सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र व राज्याचा जास्तीत जास्त निधी जिल्ह्याच्या विकासावर खर्च करणार असल्याची ग्वाही खा.पटोले यांनी यावेळी दिली. आमदार अग्रवाल म्हणाले, जनित्रामुळे विद्युत व्यवस्थेचे या माध्यमातून बळकटीकरण करण्यास मदत होत आहे. वीज वितरणचा गोंदिया शहर व ग्रामीणचा आराखडा तयार करण्यात आल्यामुळे वीजेबाबतीत समस्यांची सोडवणूक करण्यास मदत होणार आहे. प्रारंभी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उपकेंद्रातील ५ एमबी अतिरिक्त रोहित्राचे उदघाटन करण्यात आले.
प्रास्ताविकातून वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता प्रसाद रेशमे यांनी पायाभूत आराखडा २ अंतर्गत ५ एमबी अतिरिक्त रोहीत्र बसविण्यात आले आहे. त्यामुळे १४ गावांना चांगला वीज पुरवठा करण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. यावेळी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यु.बी.शहारे, अधीक्षक अभियंता (स्थापत्य) आर.आर.जनबंधू, गोंदियाचे अधीक्षक अभियंता कबीरदास चव्हाण, हिवरा व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन श्रीमती वानखेडे यांनी केले. आभार हरीष डायरे यांनी मानले.