जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा

0
9

गडचिरोली,दि.२: विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा भाग म्हणून आज विविध संघटनांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून सरकारविरोधी घोषणा दिल्या.
राज्य कर्मचारी महासंघ, जिल्हापरिषद कर्मचारी महासंघ, आयटक, सिटू इत्यादी कर्मचारी संघटना आजच्या देशव्यापी संपात सहभागी झाल्या आहेत. या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, अंगणवाडया व अन्य सरकारी कार्यालयांमध्ये आज शुकशुकाट होता. संपाचा परिणाम बँकेच्या कामकाजावरही झाला. परिणामी ग्राहकांची गैरसोय झाली. दुपारी १ वाजता आयटकने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातून मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व भाकपचे जिल्हा सचिव डॉ.महेश कोपुलवार, भाकपचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड हरिपाल खोब्रागडे, आयटकचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, आदिवासी महासभेचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल येरमे, विनोद झोडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार, अॅड.जगदीश मेश्राम आदींनी केले. सिटू संघटनेने प्रेसक्लब भवनाजवळून मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे ५ हजार अंगणवाडी सेविका, मदतनिस, शालेय पोषण आहार कर्मचारी सहभागी झाले होते. सरकारविरोधी घोषणा देत मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आगेकूच केली. सर्किट हाऊसमधून राज्य सरकारी कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चातही हजारो कर्मचारी सहभागी झाले होते.