वैरागड-मानापूर मार्ग बंद

0
15

गडचिरोली, दि.१७: कालपासून जिल्हयात सर्वत्र मुसळधार पाऊस बरसत असल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र जनजीवन विस्कळीत झाले असून, बहुतांश तालुक्यांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वैलोचना नदीच्या पुलावरुन तीन फूट पाणी वाहू लागल्याने वैरागड- मानापूर(देलनवाडी) हा मार्ग बंद झाला आहे.
काल दुपारी बहुतांश भागात पाऊस बरसला. त्यानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर रात्री पुन्हा पाऊस बसरला. आज सकाळपासून पाऊस बरसत असल्याने नदी, नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. अनेक भागातील वीज पुरवठाही बंद आहे. वैरागडनीजकच्या वैलोचना नदीच्या पुलावरुन तीन फूट पाणी वाहू लागल्याने हा मार्ग बंद आहे. वैलोचना नदीच्या पुलाची उंची कमी असल्याने हा मार्ग पावसाळयात बरेचदा बंद होत असतो. परंतु अनेकदा मागणी करुनही उंची वाढविण्यात न आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यंदाच्या पावसाळयात दोनदा वैरागड-मानापूर मार्ग बंद होता. पावसामुळे परिसरातील वीजपुरवठा कालपासूनच खंडित झाला आहे. धानोरा येथील वीजपुरवठाही खंडित आहे. गडचिरोली, चामोर्शी, अहेरी, मुलचेरा, भामरागड, कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी या तालुक्यांमध्येही पावसाचे जोरदार आगमन झाले आहे.