समाजप्रबोधनात व्यंगचित्र व अर्कचित्राची भूमिका महत्वाची -माणिक गेडाम

0
12

राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा

गोंदिया,दि. १६:- व्यंगचित्र व अर्कचित्रातून शब्दविण संवाद साधला जातो. समाजामध्ये घडणा-या विविध घटना, मानवी स्वभावाचे वैशिष्ट व्यंगचित्रामधून प्रकट केली जातात. याचवेळी अवती-भवतिच्या निरीक्षणातून टिका,गौरव,उपहास व प्रसंगी समाजप्रबोधनही व्यंगचित्र व अर्कचित्रातून केले जाते. म्हणून व्यंगचित्र व अर्कचित्र अभिव्यक्तीचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. असे मत ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यीक माणिक गेडाम यांनी व्यक्त केले.
आज १६ नोव्हेंबर रोजी विश्रामगृह येथील सभागृहात लघु वृत्तपत्र संपादक संघ, जिल्हा मराठी पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघ, गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघ, आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून व्यंगचित्र व अर्कचित्र कलेचे महत्व आणि प्रभाव या विषयावरील व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री.गेडाम बोलत होते. यावेळी जेष्ठ कवि व साहित्यीक रमेश शर्मा यांची प्रमुख वक्ता म्हणून उपस्थिती होती. जेष्ठ पत्रकार सर्वश्री एच.एच.पारधी, चंद्रकांत खंडेलवाल, राधेश्याम शर्मा व पत्रकार प्रामुख्याने उपस्थिती होती.
व्यंगचित्र व अर्कचित्राबाबत अभ्यासपूर्ण माहिती देतांना श्री. गेडाम यांनी पिकासो व जर्मनीतील पॉल क्री या व्यंगचित्रकाराच्या समर्पक उदाहरणातून सामाजिक व राष्ट्रीय व सांस्कृतिक परिस्थितीचे चित्रण केले. अर्कचित्र हे रेखाचित्र असून त्यांना भाषा व अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना श्री. शर्मा म्हणाले, मानवी स्वभावाचे असंख्य पैलू असतात. त्या निरिक्षणातून संवेदनशिलतेतून व्यंगचित्राची निर्मिती होत असते. पहिल्या जागतिक युध्दानंतर मनुष्य व्यंगचित्राकडे कसा वळला याचे मार्मिक उदाहरण त्यांनी दिले. व्यंगचित्र व अर्कचित्र तत्काळ अभिव्यक्तीचे व बिनाशब्दाचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. पारधी यांनी अभिव्यक्ती ही सामाजिक,सांस्कृतिक स्वरुपाचे असून वय व प्रसंगानुरुप भिन्न असल्याचे सांगितले. अभिव्यक्ती व माध्यमे यांचा संबंध अतिशय जवळचा असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले. संचालन जयंत शुक्ला यांनी तर उपस्थितांचे आभार माहिती सहायक पल्लवी धारव यांनी मानले.
कार्यक्रमाला हाजी अल्ताफ शेख, अतुल दुबे, संजय राऊत, खेमेंद्र कटरे, अशोक सहारे,हरिष मोटघरे, ओमप्रकाश सपाटे, निशांत कांबळे, नवीन अग्रवाल,चंद्रकांत पांडे,मिलनसिंह लिल्हारे,कपिल चौहान, आदि पत्रकारांची उप‍स्थिती होती.