व्यंगचित्रकारांनी केलेली टीका उदार मनाने स्विकारली पाहिजे – राजीव गायकवाड

0
13

नागपूर ,दि. १६टीका करणे हा व्यंगचित्रकाराचा पिंड असून तो आपले काम चोखपणे सांभाळतो. त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून केलेली टीका ही तितक्याच उदार मनाने समाजाने स्विकारली पाहिजे, असे मत प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजीव गायकवाड यांनी व्यक्त केले.

टिळक पत्रकार भवन येथे आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून श्री.गायकवाड बोलत होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ तसेच टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धा आणि व्यावसायिकतेच्या युगात व्यंगचित्रांचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही. व्यंगचित्र ही एक कला असून सत्ताधारी आणि समाजाला दिशा देण्याचे व मार्गदर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण काम ते करतात. व्यंगचित्रकार हा जन्मजातच असावा लागतो, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपिठावर माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक मोहन राठोड, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रम्हाशंकर त्रिपाठी, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सरचिटणीस शिरीष बोरकर, ज्येष्ठ पत्रकार विश्वास इंदूलकर, जोसेफ राव, जयदीप हर्डीकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, सहाय्यक संचालक जगन्नाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.आर.के. लक्ष्मण यांचे वृत्तपत्र क्षेत्रात एखाद्या संपादकापेक्षा मोठे काम होते, असे श्री.मैत्र यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माहिती संचालक श्री.राठोड म्हणाले, श्रेष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांनी काढलेले व्यंगचित्र हे समाजाला दिशा देण्याचे काम करत होते व ते वृत्तपत्र क्षेत्रात प्रभावी माध्यम म्हणून गणले जाते. आर.के.लक्ष्मण यांचे व्यंगचित्रावरुन एखाद्या वृत्तपत्राच्या लेखांचा गाभा ठरतो असेही, त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश मेश्राम यांनी तर आभार जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील पत्रकार आणि पत्रकारितेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.