कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी गाव पातळीपर्यंत यंत्रणा सज्ज ठेवा – जिल्हाधिकारी नयना गुंडे

0
75

• कोविड-19 नियमावलीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन

गोंदिया,दि. 13 : कोविड-19 हा आजार संपलेला नाही. जिल्ह्यात जरी कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी असली तरी कोरोनावर मात करण्यासाठी कोविड-19 नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी गाव पातळीपर्यंत आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज 13 सप्टेंबर रोजी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती गुंडे बोलत होत्या. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सद्यस्थितीत जिल्ह्यात सण/उत्सव सुरू असल्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शंका नाकारता येत नाही. दुसरीकडे बाजारपेठ पुर्णपणे सुरू करण्यात आले आहे. या दरम्यान कोविड-19 चे काही निर्बंध देखील शिथिल करण्यात आले आहे. अश्या परिस्थितीत कोविड-19 चा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झालेला आहे.

त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन व वैद्यकीय यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे. तसेच तालुक्यातील आरोग्य केंद्रातील उपलब्ध खाटांना ऑक्सीजनशी जोडणी करण्यात येणार आहे. औषधसाठा, प्राणवायू उपलब्ध ठेवणे, टेस्टींग वाढविणे, व्हॅक्सीनेशन वाढविणे व मृत्यूदर कमी करणे या बाबींना प्राधान्य देऊन नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी श्रीमती गुंडे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

पुढे बोलतांना श्रीमती गुंडे म्हणाल्या, कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे मास्क वापरणे, सुरक्षीत अंतर ठेवणे व हात वारंवार स्वच्छ करणे या त्रिसुत्रीमुळेच कोरोनावर मात करणे शक्य आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या असून त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सभेला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी, खंडविकास अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.