आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्य विकासासाठी प्रबोधिनी स्थापणार – विष्णू सवरा

0
9

एकलव्य निवासी शाळेचे भूमीपूजन
गोंदिया, दि.१९ : आदिवासी समाजातील विद्यार्थी व तरुण-तरुणीच्या क्रीडा कौशल्य विकासासाठी क्रीडा प्रबोधिनी स्थापन्याचा शासनाचा मानस असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी सांगितले. ते देवरी तालुक्यातील बोरगाव येथील एकलव्य निवासी पब्लिक स्कूलच्या इमारतीच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते. आमदार संजय पुराम, अप्पर आयुक्त आदिवासी विकास डॉ.माधवी खोडे, उपविभागीय अधिकारी सुनिल सुर्यवंशी, तहसिलदार संजय नागटिळक, पंचायत समिती सभापती देवकीबाई मरई, आदिवासी विकास मंडळाचे संचालक भरत दुधनाग व प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास गिरिश सरोदे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक द्वारा संचालित देवरी तालुक्यातील बोरगाव येथील एकलव्य निवासी पब्लिक स्कूलच्या इमारतीच्या जागेचे भूमीपूजन आज (ता.१९) आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे हस्ते करण्यात आले.
सवरा पुढे म्हणाले की, आदिवासी विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या अनेक योजना हाती घेतल्या आहेत. नामांकीत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची योजना शासनाने अतिशय प्रभावीपणे राबविली असून यावर्षी नामांकीत शाळा प्रवेशासाठी २५ हजार अर्ज प्राप्त झाले आहे. त्यापैकी २२ हजार विद्यार्थ्यांना नामांकीत शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता तसेच त्यांच्यामधील सुप्त क्रीडा कौशल्य गुणांना विकसीत करण्यासाठी प्रबोधिनी स्थापन्याचा शासनाचा विचार आहे. या प्रबोधिनीच्या माध्यमातून आदिवासी समाजातील गुणवान तरुण-तरुणी राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावण्यासाठी तयार होतील.
आदिवासी समाजातील विद्यार्थी भारतीय प्रशासकीय सेवा, इंजिनियर व डॉक्टर व्हावेत यासाठी आदिवासी विकास विभाग मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणाच्या संधी मिळाव्या यासाठी सुद्धा विभागाने योजना सुरु केली आहे. सध्या असलेल्या विभागाच्या २०६ आश्रमशाळा व वसतिगृहाच्या इमारत बांधकामाला मंजूरी मिळाली असून ८० शाळा वसतिगृहाचे बांधकाम मार्च २०१६ अखेर पूर्ण होणार आहे. विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध असून अडचणीवर मात करुन विद्यार्थ्यांनी शिक्षणात नावलौकीक मिळवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हे युग स्पर्धेचे असून स्पर्धेच्या या युगात आदिवासी तरुण-तरुणी टिकावे यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाशिवाय विकास शक्य नसल्याचे सांगून आदिवासी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात भरारी घ्यावी असे ते म्हणाले. आपल्या सोबतच समाजातील आपल्या बांधवांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. शाळेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ हजार रुपयाचा धनादेश श्री.सवरा यांना सुपूर्द करण्यात आला.
या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध स्टॉलला आदिवासी विकास मंत्री यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्काऊट-गाईड, युनीस्कोलॅब व पथक, व्यवस्थापन दर्शनी, शब्दकोष-शिकवा उपक्रम, ग्रंथ प्रदर्शन-सामान्य अध्ययन-स्पर्धा परीक्षा साहित्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय वर्ष, क्रीडा विभाग स्टॉल व बिरसा मुंडा स्टॉल आदि स्टॉलचा यात समावेश आहे. उपस्थितांचे आभार प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे यांनी मानले.
००००००