तिरोडासह 24 आयटीआयमधील प्रशिक्षणासाठी बाॅश कंपनीशी करार-मुख्यमंत्री

0
16
नागपूर,दि.21 : औद्योगिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे, यासाठी राज्यातील 24 औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व बॉश (BOSCH Ltd) कंपनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत ‘ब्रिज’ (Bosch’s Response to India’s Development & Growth Through Employability Enhancement) हा प्रशिक्षण कार्यक्रम राज्यातील सार्वजनिक-खाजगी भागीदारीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबविण्यात येणार आहे. शिक्षण अर्धवट सोडलेल्या युवकांसाठीही या प्रशिक्षणाचा फायदा होणार आहे, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.तत्पूर्वी विधिमंडळातील सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था व बॉश कंपनीमध्ये करार करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधू, नाशिकच्या आमदार श्रीमती सीमा हिरे, अमरावतीचे आमदार डॉ. सुनील देशमुख, संचालक जे. डी. भुतांगे, कौशल्य विकासचे सहसचिव आर. जी. जाधव, उपसंचालक योगेश पाटील, बॉश कंपनीचे महाव्यवस्थापक मोहन पाटील, उपाध्यक्ष सुधीर येवलेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बॉश कंपनीसोबत राज्यातील इतरही औद्योगिक संस्थांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून राज्यातील युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे.आज झालेल्या सामंजस्य करारानुसार या प्रशिक्षण कार्यक्रमात राज्यातील बोरिवली, बेलापूर, रत्नागिरी (ग्रामीण), कर्जत, सिन्नर, चांदवड, येवला, नाशिक, औंध आयटीआय (पुणे), शिरूर, खेड, पंढरपूर, लातूर-ग्रामीण, अंबड, घाटंजी, अकोला-ग्रामीण, अमरावती, तिरोडा, पोंभुर्णा, नागपूर, भंडारा-ग्रामीण, मूल (अमरावती), तुमसर, मोखाडा या औद्योगिक संस्थांचा समावेश होणार आहे.

औद्योगिक संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत विविध औद्योगिक आस्थापनांच्या सहयोगाने राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची (आयटीआय) गुणवत्तावाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जर्मन दौऱ्यातील इंडस्ट्रिअल फेअरमध्ये बॉश कंपनीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली होती. त्यानुसार राज्यातील एकूण 25 आयटीआयमध्ये ‘ब्रिज’ (BRIDGE) हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची तयारी कंपनीने दर्शविली होती. त्यानुसार आज हे करार करण्यात आले. या प्रशिक्षणाअंतर्गत प्रत्येक औद्योगिक संस्थेमध्ये प्रत्येकी 25 लाख रुपये खर्च करून आधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमानुसार राज्यातील सार्वजनिक-खाजगी भागीदारीतील औद्योगिक संस्थांमधील प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षकांना उद्योगांसाठी आवश्यक असणारे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यानुसार पथदर्शी प्रकल्प म्हणून नाशिक येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हा ब्रिज प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासंबंधीचा करार 24 जुलै 2015 रोजी नाशिक येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची व्यवस्थापन समिती व बॉश कंपनी यांच्यात करण्यात आला. त्यानुसार 25 विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण सुरू झाले असून कंपनीने तेथे एक आधुनिक लॅब तयार केली आहे. उर्वरित 24 औद्योगिक संस्था व बॉश कंपनी यांच्यात आज करार करण्यात आला.

शिक्षण अर्धवट सोडलेल्यांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण
शिक्षण अर्धवट सोडलेल्या समाजातील तरुणांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमही या अंतर्गत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार शिक्षण सोडलेल्या 18 ते 25 वयोगटातील रोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी विविध उद्योगांमध्ये रोजगार मिळण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये जसे संवाद कौशल्य, (कम्युनिकेशन स्किल), व्यक्तिमत्व विकास, ग्राहक सेवा, स्वयंशिस्त, मुलाखत कौशल्य, औद्योगिक विशेष ज्ञान, इंग्रजी संभाषण कौशल्य, संगणकाची माहिती आदींचा समावेश असलेला दोन महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी पाच हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार असून त्यापैकी 500 रुपये उमेदवाराने नोंदणी शुल्क म्हणून भरणे आवश्यक आहे. उर्वरित साडेचार हजार रुपये बॉश कंपनीने करार केलेल्या बँकेमार्फत उमेदवारास कर्ज म्हणून देण्यात येणार आहेत. तसेच पहिल्या सहा बॅचसाठी अडीच हजार रुपये किमतीचे लर्नर किटही कंपनीमार्फत देण्यात येणार आहे.
प्रशिक्षण कार्यक्रम आराखडा
‘ब्रिज’ प्रशिक्षण कार्यक्रमानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींसाठी दरवर्षी दोन दिवसांचे सॉफ्ट स्किल प्रशिक्षण घेणे, विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग तथा इंटर्नशिप सुविधा पुरविणे, या करारातील आयटीआयमधील तसेच परिसरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षकांसाठी दरवर्षी 25 प्रशिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे कौशल्य विषय प्रशिक्षण देणे यांचा समावेश आहे.
तंत्रज्ञान व सेवा पुरविणारी बॉश जागतिक कंपनी
जर्मनीतील बॉश ग्रुप कंपनी ही अभियांत्रिकी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि सेवा पुरविणारी जागतिक कंपनी आहे. बॉश ग्रुपने 1922 साली भारतात प्रवेश केला आणि 1953 साली उत्पादन सुरू केले. आतापर्यंत कंपनीने भारतात 10 उत्पादन केंद्रे व 7 ठिकाणी डेव्हलपमेंट अँड ॲप्लिकेशन सेंटर सुरु केली असून सुमारे 26 हजार कर्मचारी काम करीत आहेत.