गृहराज्यमंत्र्याच्या उपस्थितीत सहा नक्षलवाद्यांचे अात्मसर्मपण

0
8

गडचिरोली,दि.22-नक्षलवाद मोडून काढण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाने केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यामुळे लवकरच हा जिल्हा नक्षल प्रभावातून मुक्त होईल अशी अपेक्षा निर्माण झाल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केले. सहा नक्षलवाद्यांनी आज त्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. गडचिरोली जिल्हयातील दौऱ्यादरम्यान ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम , विशेष पोलिस महानिरिक्षक रविंद्र कदम,  पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बारस्कर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर होते.
यावर्षात शरण येणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या ५२ झाली आहे. या शरण आलेल्या ६ जणांना यावेळी शिंदे यांच्या हस्ते धनादेश व गृहोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. सोबतच यापूर्वी आत्मसमर्पण करणाऱ्या तीन नक्षलवाद्यांना यावेळी भुखंड पट्टा वाटपाचे प्रमाणपत्र देण्यात आले.ram shinde gadchiroli
पोलीस दलात उत्तम काम करणाऱ्यांना पदोन्नती देण्याची योजना आहे. अशी उत्तम कामगिरी करणाऱ्या ३५ पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यात १८ पोलीस नाईक पदावरील कर्मचाऱ्यांना, १७ पोलीस हवालदार पदावरील कर्मचाऱ्यांना तसेच सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे फ्लॅग आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
गडचिरोली येथे खुले कारागृह नुकतेच सुरु झाले आहे. या कारागृहातील बंद्यांसाठी ब्लँकेट तुरुंग अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले यांना देण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलिस दलातर्फे ही भेट दिली.सूत्रसंचालन पोलीस दलाच्या जनसंपर्क अधिकारी उपनिरिक्षक तेजस्वी पाटील यांनी केले.