डाॅ.आंबेडकर, म. फुलेंच्‍या विचाराचा अंगीकार करा- ना. मुनगंटीवार

0
10

चिचाळा गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. ज्‍योतीबा फुले यांच्‍या पुर्णाक़ती पुतळयांचे अनावरण

 चंद्रपूर,दि.26-भारतरत्‍न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिशादर्शक विचारांची देण दिली आहे. क्रांतीसुर्य महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांनी उपेक्षीत, वंचितांच्‍या उत्‍थानासाठी संघर्ष करत सामाजिक न्‍यायासाठी लढा दिला. त्‍यांचा संघर्ष आजच्‍या पिढीसाढी दीपस्‍तंभासारखा मार्गदर्शक आहे. या दोन्‍ही महामानवांच्‍या  विचारांचा अंगीकार करत पुढे जाण्‍याची आज नितांत आवश्‍यकता आहे. हेच त्‍यांचे खरे पुण्‍यस्‍मरण ठरेल. हे वर्ष महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे वर्ष आहे. यावर्षी चिचाळा गावात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्‍यात आला हे विशेष महत्‍वाचे आहे.जिवन जगण्‍यासाठी शिक्षण गरजेचे आहे असे बाबासाहेबांनी म्‍हटले आहे. तसेच क्रांतीसुर्य महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांनी आपले अवघे आयुष्‍य शिक्षणाच्‍या प्रसार व प्रचारात खर्ची घातले. या विकासप्रक्रियेत शिक्षणावर विशेष भर देत या गावाचा विकास आम्‍ही साधणार आहोत असे प्रतिपादन वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दि. 25 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्‍हयातील मुल तालुक्‍यातील चिचाळा या गावात छञपती शाहु फुले आंबेडकर बहुउद्देशिय संस्‍था चिचाळा या संस्‍थेच्‍या वतीने आयोजित क्रांतीसुर्य महात्‍मा ज्‍योतीबा फुले आणि भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुर्णाकृती पुतळयाच्‍या अनावरण समारंभात बोलत होते. या दोन्‍ही पुतळयांचे अनावरण वित्‍तमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी आ. नानाजी शामकुळे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. व्हि. डी. मेश्राम, प्रविण खोब्रागडे, सुनिल खोब्रागडे, अशोक निमगडे, गुरूदास चौधरी, मेघराज काटकर, प्रभाकर भोयर, नंदु रणदिवे, नामदेव डाहुले, सरपंच सुषमा सिडाम आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.