शरद पवारांचे विदर्भाबाबतचे वक्तव्य दुर्दैवी: माजी मंत्री दत्ता मेघे

0
18

गडचिरोली, दि. .१८: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पिंपरीचिंचवड येथील साहित्य संमेलनात केलेले स्वतंत्र विदर्भाबाबतचे वक्तव्य दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री व भाजप नेते दत्ता मेघे यांनी आज येथे व्यक्त केली.

विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या सदस्य मेळाव्यासाठी दत्ता मेघे गडचिरोलीत आले असता स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे पत्रकार परिषद घेऊन स्वतंत्र विदर्भ व विकासाबाबत चर्चा केली. कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अ.भा.मराठी साहित्य संमेलनातील मुलाखतीदरम्यान “स्वतंत्र विदर्भ ही अमराठी लोकांची मागणी असून, ती राजकीय हेतूने प्रेरीत आहे”, असे म्हटले होते. याबाबत दत्ता मेघे यांनी  पवारांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे म्हटले. श्री.मेघे म्हणाले, शरद पवारांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करायची नाही, असे आपण ठरविले आहे. पवार बॅलन्स ठेवून बोलतात. स्वतंत्र विदर्भाची मागणी लोकांची नाही, असे पवारांना म्हणायचे असावे, अशा शब्दात मेघे यांनी पवारांची पाठराखण केली. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा व शिवसेनेचा स्वतंत्र विदर्भाला विरोध आहे. मात्र लहान राज्ये झाली पाहिजेत, अशी भाजपची भूमिका असून, भाजपच स्वतंत्र विदर्भ करु शकते, असे ठामपणे सांगतानाच दत्ता मेघे यांनी शिवसेना सत्तेत सहभागी असेपर्यंत विदर्भ होणार नाही, असेही स्पष्ट केले.