पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

0
14

गोंदिया,दि.२५ : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदान कांरजा येथे आज २६ जानेवारी रोजी मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सकाळी ९.१५ वाजता संपन्न होणार आहे. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वजदिन २०१४ यावर्षीच्या निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.विजय सूर्यवंशी व सुभेदार मेजर जगदिश रंगारी यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येईल. पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र व बक्षिस देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येईल. जिवाची पर्वा न करता अपघातातील ट्रकच्या बेशुद्ध चालकास मदत केल्याबद्दल जि.प.चे वाहन चालक एच.बी.हेमने यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सत्कार, दिल्ली पब्लिक स्कूल अंभोरा येथील विद्यार्थीनी वनश्री बडवाईक या विद्यार्थीनीने राष्ट्रीयस्तरावर आयोजित केलेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय स्थान मिळाल्याबद्दल सत्कार, बंधु प्रसारक शिक्षण मंडळ गणखैरा या संस्थेला जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कार, इच्छा बाजपेयी, सारा टिकेकर, संदिप कापसे या माजी सैनिकांच्या पाल्यांना दहावीत उत्कृष्ट टक्केवारी मिळविल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तीपत्र देण्यात येईल. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवसायासाठी कर्ज घेऊन उद्योग उभारुन कर्जाची शंभर टक्के परतफेड करणाऱ्या श्रीमती चांगुनाबाई नंदेश्वर, श्रीमती सुजाता ऊके व श्रीमती निशा बंसोड या लाभार्थी महिलांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात येईल